पिठलं भाकरी ठेचा (Pithale Bhakri With Pungent C...

पिठलं भाकरी ठेचा (Pithale Bhakri With Pungent Chutney)

पिठलं
साहित्य : 2 कप बेसन, 5 कप गरम पाणी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी, 10-12 कढीपत्ते, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून हळद, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 टेबलस्पून किंवा स्वादानुसार हिरवा ठेचा, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : बेसनात थोडं पाणी मिसळून ठेवा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. आता जाड बुडाच्या भांड्यात मध्यम आचेवर तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि हळदीची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात हिरवी मिरची, कांदा आणि कढीपत्ते घालून परतवा. कांदा पारदर्शक झाला की, त्यात हिरवा ठेचा घालून पाच मिनिटं परतवा. नंतर त्यात पाणी घालून उकळी येऊ द्या. मिश्रणाला उकळी आली की, त्यात बेसनाचं मिश्रण घालून सतत ढवळत राहा. बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यात मीठ मिसळा. बेसन शिजून, मिश्रण दाट होईपर्यंत ते सतत ढवळत राहा. नंतर त्यात कोथिंबीर मिसळून गरमागरम पिठलं बाजरीची भाकरी आणि हिरव्या ठेच्यासोबत सर्व्ह करा.
तांदळाची भाकरी
साहित्य : अडीच कप तांदळाचं पीठ, 3 कप पाणी.
कृती : सर्वप्रथम पीठ चाळणीने चाळून घ्या. नंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली की, त्यात लगेचच एका हाताने थोडं थोडं पीठ घालत ढवळत राहा, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. नंतर गॅस बंद करावा. उकड तयार झाली. ही उकड गरम असतानाच चांगली मळून घ्या. ती पोळ्यांच्या कणकेइतपत मऊसर झाली पाहिजे. उकडीचे 2 इंच व्यासाचे गोळे तयार करून एका ओल्या फडक्याखाली किंवा टिश्यू पेपरखाली झाकून ठेवा. भाकरी शक्यतो लगेचच करायला घ्या.
एकीकडे खापरी तापत ठेवा. चूल असल्यास अति उत्तम. परातीवर पिठाचा एक गोळा घेऊन तांदळाच्या पिठाचा हात लावून भाकरी थापा. दोन्ही हाताच्या चारही बोटांचे ठसे उमटत भाकरी गोल आकार घेत मोठी व्हायला हवी. भाकरी तयार झाल्यावर अलगद दोन्ही हातांनी उचलून पिठाची म्हणजे वरची बाजू वरच येईल, अशा पद्धतीने ती तव्यावर ठेवा. भाकरी दोन्ही बाजूंनी चांगली शेकवून घ्या. अशा प्रकारे सर्व भाकर्‍या भाजून घ्या. गरमागरम मासळीच्या रश्शासोबत किंवा मटणासोबत तांदळाची भाकरी सर्व्ह करा.
लाल ठेचा
साहित्य : 5 लाल मिरच्या, 2 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : सर्व साहित्य एकत्र खलबत्त्यातून ठेचून घ्या किंवा मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.

पिठलं भाकरी ठेचा, Pithale Bhakri

वांग्याचं भरीत (Spicy Baigan Bharta)