भाज्यांची लोणची (Pickles Ma...

भाज्यांची लोणची (Pickles Made From Vegetables)

भेंडीचं लोणचं


साहित्य : 1 किलो ताजी भेंडी, 5 कैर्‍या (चौकोनी तुकडे केलेल्या), 100 ग्रॅम पिवळ्या मोहरीची पूड, 2 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून बडीशेप, 1 टीस्पून गरम मसाला पूड,
200 मिलिलीटर तेल, अर्धा टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून हळद, स्वादानुसार मीठ.
कृती : भेंडी धुऊन स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घ्या. भेंडीचे शेंडा आणि टोक कापून, मध्यभागी उभी चिर द्या. कैरीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या. धणे आणि बडीशेप जाडसर वाटून घ्या.
आता कढईमध्ये अर्धं तेल गरम करून त्यात भेंडी, कैरी आणि सर्व मसाले घालून चांगले एकजीव करून घ्या. थोड्या वेळाने हे मिश्रण आचेवरून खाली उतरवा आणि थंड होऊ द्या. लोणचं थंड झालं की, स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरा. त्यात उर्वरित तेल सोडून व्यवस्थित एकत्र करा. साधारण तीन दिवस हे लोणचं चांगलं मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.

बटाट्याचं लोणचं


साहित्य : 1 किलो लहान बटाटे (बेबी पोटॅटोज), 4 टेबलस्पून मोहरीची पिवळी पूड, 2 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून हळद, स्वादानुसार मीठ, 5 हिरव्या मिरच्या.
कृती: बटाटे उकडून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरची पूड, हळद, मोहरी पूड आणि मीठ एकत्र करा. नंतर त्यात बटाटे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडं परतवून आच बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. लोणचं पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. ही बरणी तीन-चार दिवस उन्हात ठेवा. नंतर लोणचं
खाण्यास घ्या.

गाजराचं लोणचं


साहित्य : अर्धा किलो गाजर, 2 लीटर पाणी, 250 ग्रॅम पिवळ्या मोहरीची पूड, 2 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून हळद, स्वादानुसार मीठ.
कृती : एका बरणीमध्ये पाणी, मोहरी, हळद आणि मीठ एकत्र करून पाच दिवस तसंच ठेवून द्या. सहाव्या दिवशी गाजर स्वच्छ धुऊन घ्या. नंतर एका पॅनमध्ये गरम पाणी घेऊन त्यात ही गाजरं पाच मिनिटं बुडवून ठेवा. पाच मिनिटांनंतर गाजरं पाण्यातून काढून पाच मिनिटांकरिता वार्‍यावर सुकत ठेवा. त्यानंतर ही गाजरं बरणीमधील पाण्यात सोडा. त्यात लाल मिरची पूड घालून व्यवस्थित एकत्र करा. लोणचं दोन-तीन दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.

मिश्र भाज्यांचं लोणचं
साहित्य : पाव किलो फ्लॉवर, पाव किलो गाजर, 100 ग्रॅम मटार, 25 ग्रॅम लाल मिरची पूड, 25 ग्रॅम भरड वाटलेली मोहरी, 10 ग्रॅम हळद, 10 ग्रॅम भरड वाटलेले मेथी दाणे, 5 ग्रॅम हिंग, 500 ग्रॅम तिळाचं तेल, 40 ग्रॅम मीठ, 2 टीस्पून लिंबाचा रस.
कृती : गाजर आणि फ्लॉवर धुऊन त्यातील पाणी पूर्णतः निथळून घ्या. कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी दाणे, मीठ, लाल मिरची पूड, हिंग आणि हळद घालून परतवून घ्या. आच बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर या मसाल्यात गाजर, मटार, लिंबाचा रस, फ्लॉवर आणि दोन चमचे तेल घालून एकजीव करून घ्या. आता उरलेलं तेल गरम करून थंड होऊ द्या. हे तेल लोणच्यामध्ये मिसळा आणि लोणचं थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. दोन-तीन दिवस ते चांगलं मुरू द्या. त्यानंतर
खाण्यास घ्या.