भाज्यांची लोणची (Pickles Made From Vegetables)

भाज्यांची लोणची (Pickles Made From Vegetables)

सुरणाचं लोणचं


साहित्य : 1 किलो सुरण, 200 ग्रॅम पिवळी मोहरी पूड, 100 ग्रॅम जिरं पूड, 100 ग्रॅम लाल मिरची पूड, 1 टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून बडीशेप, 5 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : कढईमध्ये तेल गरम करून, त्यात सर्व मसाले घाला आणि मिनिटभर परतवा. त्यात सुरण घालून पाच मिनिटं परतवा आणि नंतर आच बंद करा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. साधारण तीन दिवस हे लोणचं चांगलं मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.

आल्याचं लोणचं


साहित्य : 1 किलो बारीक चिरलेलं आलं, 250 ग्रॅम बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 4 टेबलस्पून पिवळी मोहरी पूड,
1 टेबलस्पून व्हिनेगर, स्वादानुसार मीठ.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. साधारण तीन दिवस हे लोणचं चांगलं मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.

कच्च्या हळदीचं लोणचं


साहित्य : 1 किलो कच्ची हळद, 50 ग्रॅम पिवळ्या मोहरीची पूड, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : कच्ची हळद स्वच्छ धुऊन, कोरडी करून घ्या. नंतर बारीक चिरून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल कोमट गरम करून, त्यात सर्व मसाले आणि हळदीचे तुकडे घालून तीन-चार मिनिटं परतवा. नंतर मिश्रण आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. लोणचं चार दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.

शिंगाड्याचं लोणचं
साहित्य : 1 किलो कच्चे शिंगाडे, अर्धा कप मोहरी पूड, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून हिंग, पाव कप लाल मिरची पूड, 5 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : शिंगाडे सोलून दोन भागात चिरून घ्या. एका पॅनमध्ये हे शिंगाड्याचे तुकडे आवश्यकतेनुसार पाणी घालून नरम होईपर्यंत उकडून घ्या. नंतर त्यातील पाणी निथळून टाका. स्वच्छ सुती कापडावर हे शिंगाड्याचे तुकडे पसरवून वार्‍यावर सुकत ठेवा. आता एका वाडग्यामध्ये सर्व मसाले, 2 टेबलस्पून तेल आणि शिंगाडे एकजीव करून घ्या. हे मिश्रण स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं दोन-तीन दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर त्यावर उर्वरित तेल व्यवस्थित एकत्र करा, नंतर खाण्यास घ्या.