फळांपासून बनवलेली लोणची (Pickles Made From Fruit)

फळांपासून बनवलेली लोणची (Pickles Made From Fruit)

 

अननसाचं आंबट-गोड लोणचं


साहित्य : 1 किलो अननस, अर्धा किलो साखर, 100 ग्रॅम पाणी, 1 टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पूड.
कृती : अननसाची सालं तासून, लहान-लहान तुकडे करून घ्या. पाण्यात साखर एकत्र करून मंद आचेवर उकळत ठेवा. साखरेचा पाक तयार झाला की, त्यात अननसाचे तुकडे घाला आणि पाच मिनिटं मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात वेलची आणि जायफळ पूड एकत्र करा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. दोन-तीन दिवस ते चांगलं मुरू द्या. त्यानंतर खाण्यास घ्या.

फणसाचं लोणचं


साहित्य : 1 किलो कच्चा फणस, अर्धा कप मोहरी, पाव कप लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 2 टीस्पून पांढरे व्हिनेगर, 8 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : फणस स्वच्छ करून त्याचे मोठे आकाराचे तुकडे करून घ्या. नंतर हे तुकडे पाण्यात उकळत ठेवा. फणसाचे तुकडे थोडे नरम झाले की, आचेवरून उतरवा. त्यातील पाणी निथळून, फणसाचे तुकडे स्वच्छ सुती कापडावर पसरवून वार्‍यावर सुकत ठेवा.
एका पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल साधारण गरम करून आचेवरून उतरवून ठेवा. त्यात सर्व मसाले, व्हिनेगर आणि सुकलेले फणसाचे तुकडे घालून एकजीव करून घ्या. हे मिश्रण स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं दोन-तीन दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर त्यावर उर्वरित तेल व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर लोणचं पुन्हा एक दिवस मुरू द्या, नंतर खाण्यास घ्या.

फणसाच्या आठळीचं लोणचं
साहित्य : 2 वाटी उकडलेल्या फणसाच्या आठळ्या, फोडणीसाठी तेल, 2 वाटी कैरीच्या फोडी, 1 टेबलस्पून मेथीचे दाणे, 1 टेबलस्पून हिंग, अर्धा वाटी लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून हळद, अर्धा वाटी मीठ, 3 टेबलस्पून पिवळी मोहरी पूड.
कृती : फणसाच्या उकडलेल्या आठळ्यांच्या टरफलाचा कडक भाग काढून टाका. नंतर त्याचे तुकडे करा. मेथीचे दाणे तेलात तळून, नंतर बारीक वाटून घ्या. याच कढईत आणखी थोडं तेल गरम करून, त्यात हिंग, हळद आणि लाल मिरची पूड घालून परतवून घ्या. कोरड्या कढईत मीठ भाजून घ्या. आता हे सर्व मसाल्याचं साहित्य एकत्र करून घ्या. कैरीच्या आणि आठळ्यांच्या फोडी एकत्र करून, त्यात मसाला कालवा. लोणचं स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. दोन वाटी तेल गरम करून, नंतर थंड करा आणि लोणच्याच्या बरणीत घाला.

चिकूचं लोणचं


साहित्य : 4 चिकू, 1 वाटी लिंबाचा रस, अर्धा वाटी साखर, 1 टेबलस्पून सुंठ पूड, 1 टेबलस्पून लवंग पूड, अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : कढईत लिंबाचा रस, साखर आणि मीठ एकत्र करा, याला चांगली उकळी येऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर यात सुंठ पूड, लवंग पूड, मिरी पूड आणि मिरची पूड घालून चांगलं एकजीव करा. नंतर त्यात चिकूचे काप घालून, मंद आचेवर परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. आठ दिवस ते चांगलं मुरू द्या. त्यानंतर खाण्यास घ्या.
संत्र्याचं लोणचं


साहित्य : 1 किलो संत्री, पाऊण किलो साखर, 2 टेबलस्पून भाजलेलं जिरं,
1 टेबलस्पून काळी मिरी पूड,
1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून हिंग,
2 टीस्पून वेलची पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : संत्री धुऊन स्वच्छ कापडाने पुसून घ्या. नंतर सालासकट या संत्र्याचे दोन भाग करा. मोठ्या वाडग्यात संत्री, साखर आणि मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे मिश्रण आठ-दहा दिवस उन्हात सुकवा. नंतर त्या सर्व मसाले चांगले एकजीव करा आणि हे मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. दोन-तीन दिवस ते चांगलं मुरू द्या. त्यानंतर खाण्यास घ्या.
टीप : या लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्तच घालायला हवं.