वेगळ्या प्रकारची लोणची (Pickle Recipes With Dif...

वेगळ्या प्रकारची लोणची (Pickle Recipes With Difference)

कारल्याचं लोणचं

साहित्य : 1 किलो कारली, 200 ग्रॅम पिवळ्या मोहरीची पूड, 2 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून कलौंजी, 2 टेबलस्पून धणे पूड, 4 टेबलस्पून बडीशेप, 5 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : कारली स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. नंतर त्याच्या चकत्या करा. त्यात मीठ एकत्र करून आठ-नऊ तासांसाठी झाकून ठेवा. नंतर कारल्याच्या चकत्या व्यवस्थित धुऊन घ्या. बडीशेप जाडसर वाटून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सर्व मसाले घाला आणि मिनिटभर परतवा. त्यात कारलं घालून दोन मिनिटं परतवा. नंतर कारल्याचं मिश्रण आचेवरून खाली उतरवून थंड होऊ द्या. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.

बांबूचं लोणचं

साहित्य : 10-12 बांबूच्या हिरव्या काड्या, 4 टेबलस्पून पिवळ्या मोहरीची पूड, 2 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धणे पूड, 1 लहान तुकडा दालचिनी, 5 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सर्व साहित्य घाला. पाच मिनिटं सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घ्या. नंतर मिश्रण आचेवरून खाली उतरवा आणि थंड होऊ द्या. लोणचं पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं चार-पाच दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.

टोमॅटोचं लोणचं


साहित्य : 1 किलो लाल टोमॅटो, 3 टेबलस्पून लाल मिरची पूड, 3 टेबलस्पून पिवळी मोहरी पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : टोमॅटो स्वच्छ धुऊन कोरडे करा आणि मध्यम आकारात चिरून घ्या. आता सर्व साहित्य चांगलं एकजीव करून स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. हे लोणचं चार दिवस व्यवस्थित मुरू द्या. त्यानंतर खाण्यास घ्या.

डाळ-पालक-शलजमचं लोणचं
साहित्य : 500 ग्रॅम शलजम, 1 पालकाची जुडी, 250 ग्रॅम हिरवी मूग डाळ, 500 मिलिलीटर तेल, 1 कप व्हिनेगर, 2 टेबलस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून धणे पूड, 100 ग्रॅम पिवळी मोहरी पूड, 1 टीस्पून गरम मसाला पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : शलजम तासून, चिरून घ्या. पालक स्वच्छ धुऊन चिरून घ्या. हिरवी मूग डाळ तासभर भिजवून त्यातील पाणी निथळून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यात शलजम, पालक आणि डाळ एकत्र करून दोन मिनिटं परतवा. त्यात सर्व मसाले घालून चांगले एकजीव करून घ्या. हे मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं चार दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.