कॉर्न-पनीर भजी आणि स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स (Pane...

कॉर्न-पनीर भजी आणि स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स (Paneer And Corn Recipes)

कॉर्न-पनीर भजी

साहित्य : 10 बेबीकॉर्न (प्रत्येकाचे आडवे दोन भाग करून), 1 कप बेसन, 1 कप कुस्करलेलं पनीर, चिमूटभर हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून चाट मसाला, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : पनीर, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि चाट मसाला यांचं एकजीव मिश्रण तयार करा. प्रत्येक बेबीकॉर्नचा तुकडा घेऊन, त्यावर हे मिश्रण व्यवस्थित लपेटा. बेसनात सोडा, हळद, लाल मिरची पूड, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून दाट घोळ तयार करा. पनीरचं मिश्रण लावलेला प्रत्येक बेबीकॉर्नचा तुकडा या बेसनाच्या घोळामध्ये घोळून गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम कॉर्न-पनीर भजी टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स

साहित्य : एका मक्याच्या कणसाचे किसलेले दाणे, 150 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 4 टेबलस्पून मैदा, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी सिमला मिरची बारीक चिरलेली, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 3 टेबलस्पून घट्ट दही, चिमूटभर खाण्याचा सोडा, चीझचे काही लहान चौकोनी तुकडे, पाव कप ब्रेड क्रम्स, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : चीज आणि ब्रेड क्रम्स सोडून उर्वरित सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. यातील थोडंसं मिश्रण तळहातावर घेऊन त्यामध्ये एक चीझचा तुकडा घाला आणि त्यास गोल आकार द्या. अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून, ब्रेड क्रम्समध्ये घोळा आणि गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स हिरवी चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करा.