संत्र्याचा जॅम (Orange Jam)

संत्र्याचा जॅम (Orange Jam)

संत्र्याचा जॅम

साहित्य : 3 संत्री, दीड कप पाणी, दीड कप साखर.

कृती : संत्री सोलून, मध्यभागी असलेला पांढरा भाग आणि धागे काढून टाका. आता हात धुऊन (टीप पाहा) घ्या. नंतर संत्र्याच्या प्रत्येक फोडीवरील पांढरं पारदर्शक आवरण आणि बियाही काढून टाका. केवळ संत्र्याचा गर एका वाडग्यात काढून घ्या. एका संत्र्याची साल उभी अगदी पातळ चिरून (साधारण पाव कप किंवा 2 टेबलस्पून यापेक्षाही कमी प्रमाण असायला हवं) घ्या. त्या धुऊन, साधारण कोरड्या करून घ्या. हातही धुऊन घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये संत्र्याचा गर आणि रस, बारीक चिरलेली साल आणि दीड कप पाणी घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रणाला उकळी आली की, मंद आचेवर मिश्रण 30 मिनिटांकरिता शिजत ठेवा. नंतर त्यात एक कप साखर घालून ती विरघळून मिश्रण दाट होईपर्यंत ढवळत राहा. याला साधारण 20 मिनिटं लागतील. मिश्रण जेल पॉइंटवर येईपर्यंत सतत ढवळत राहा. मिश्रण थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा.
टीप :
संत्री ताजी आणि थोडी आंबट असायला हवीत.
संत्रं स्वच्छ केल्यावर हात धुवायला सांगितले आहेत, कारण संत्र्यामधील पांढरा भाग अतिशय कडू असतो. संत्रं सोलताना हा कडवटपणा हातावर पसरतो. हात न धुतल्यास हा कडवटपणा जॅममध्येही जाऊ शकतो.
जेल पॉइंट ओळखण्यासाठी ः एक ग्लास पाणी घ्या. मिश्रण दाट झाल्यावर त्याचा एक थेंब ग्लासामधील पाण्यात घाला.
थेंब पाण्यात विरघळला तर मिश्रण अजून थोडा वेळ शिजवायला हवं. मात्र थेंब न विरघळता तळाला पोहोचला तर जॅम तयार झालं म्हणून समजा.