मॉडर्न पोटॅटो रेसिपीज: क्रिस्पी फ्रेंच फ्राइज आ...

मॉडर्न पोटॅटो रेसिपीज: क्रिस्पी फ्रेंच फ्राइज आणि पोटॅटो गार्लिक टिक्का (More Modern Potato Recipes: Crispy French Fries And Potato Garlic Tikka)

क्रिस्पी फ्रेंच फ्राइज

साहित्य : 1 बटाटा, 3 टीस्पून कॉर्नफ्लोअर, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, स्वादानुसार चाट मसाला, तळण्यासाठी तेल.
कृती : बटाटे तासून स्वच्छ धुऊन घ्या. आता या बटाट्यांचे लांबट पातळ तुकडे करा आणि थंड पाण्यात बुडवून ठेवा, म्हणजे बटाट्यांचा रंग बदलणार नाही. आता एका पॅनमध्ये पाणी आणि मीठ घालून उकळत ठेवा. त्यात बटाट्याचे तुकडे घालून अर्धवट शिजवून घ्या. नंतर बटाट्यातील पाणी पूर्णतः निथळून, ते एका स्वच्छ सुती कापडावर सुकत ठेवा. बटाट्याच्या फोडी कोरड्या झाल्या की, त्यात कॉर्नफ्लोअर मिसळून अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या. अर्ध्या तासानंतर बटाट्याच्या फोडी गरम तेलात मोठ्या आचेवर सौम्य सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. हे फ्रेंच फ्राइज सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवून त्यावर काळी मिरी पूड व चाट मसाला भुरभुरा आणि गरमागरम सर्व्ह करा.

पोटॅटो गार्लिक टिक्का

साहित्य : 10 बेबी पोटॅटोज (दोन भाग केलेले), 1 कप सिमला मिरची मोठे चौकोनी तुकडे केलेली, 2 कांदे मोठे चौकोनी तुकडे केलेले, 10 काजू (भिजवून 1 टेबलस्पून पाण्यात बारीक वाटून घेतलेले), 1 टेबलस्पून लसणाची पेस्ट, पाऊण कप घट्ट दही, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून आल्याची पेस्ट, 1 टीस्पून कसुरी मेथी, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : ओव्हन 180 डिग्री सेल्सियसवर प्रीहिट करत ठेवा. पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात बेबी पोटॅटोज 10 मिनिटं नरम होईपर्यंत शिजवा. एका वाडग्यात काजूची पेस्ट, आलं-लसणाची पेस्ट, दही, लाल मिरची पूड, धणे पूड, कसुरी मेथी, मीठ आणि लिंबाचा मिसळा. त्यात बटाटे, सिमला मिरची आणि कांदा घालून अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. नंतर मॅरिनेटेड बटाटे, सिमला मिरची आणि कांद्याचा एक-एक तुकडा सळई लावून त्यावर ब्रशच्या साहाय्याने तेल लावा. ही सळई प्रीहिटेड ओव्हनमध्ये 20 मिनिटं बेक करण्यासाठी ठेवून द्या. गरमागरम पोटॅटो गार्लिक टिक्का हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.