स्पायसी ओनियन समोसा आणि पनीर पापड समोसा (Monsoo...

स्पायसी ओनियन समोसा आणि पनीर पापड समोसा (Monsoon Special : Samosa Recipe)

स्पायसी ओनियन समोसासाहित्य :
5 रेडिमेड समोसा पट्टी, तळण्यासाठी तेल.
सारणासाठी : 2 कांदे उभे पातळ चिरलेले, 1 टीस्पून मोहरी, थोडे कढीपत्ते, 2 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चिमूटभर हळद पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून धणे पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरीची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात कढीपत्ते, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट मिसळून मिनिटभर परतवा. आता आच बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. थोड्या वेळाने पुन्हा आचेवर ठेवून त्यात हळद आणि कांदा घालून, तो पारदर्शक होईपर्यंत परतवा. नंतर त्यात धणे पूड, मीठ आणि कोथिंबीर मिसळून आचेवरून खाली उतरवा.
आता समोशाची एक पट्टी घेऊन, त्यास समोशाचा आकार द्या. त्यात 1 टीस्पून सारण भरून पाण्याचा हात लावून कडा बंद करा. अशा प्रकार सर्व समोसे तयार करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. गरम तेलात समोसा सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम स्पायसी ओनियन समोसा हिरवी चटणी आणि वाफाळत्या चहासोबत सर्व्ह करा.

पनीर पापड समोसासाहित्य :
5 उडदाचे पापड, तळण्यासाठी तेल, 1 टेबलस्पून मैद्याचं मिश्रण, आवश्यकतेनुसार पाणी.
सारणासाठी : 1 टीस्पून तेल, अर्धा टीस्पून जिरं, 250 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 2 बटाटे उकडून कुस्करलेले, 1 टेबलस्पून मटार उकडून कुस्करलेले, एक तृतीयांश टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून आमचूर पूड, अर्धा टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून लिंबूरस, स्वादानुसार मीठ.
कृती : सारण तयार करण्यासाठी, एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिर्‍याची फोडणी करा. जिरं तडतडलं की, त्यात सारणासाठीचं उर्वरित सर्व मिश्रण घाला आणि चांगलं एकजीव करा. नंतर हे मिश्रण आचेवरून उतरवून एका ताटात पसरवा आणि थंड होऊ द्या.
आता प्रत्येक पापडाचे मधून दोन तुकडे करा. एका ताटात पाणी घेऊन त्यात हे पापड बुडवा. नंतर पाणी निथळून, पापड साधारण कोरडे करून घ्या. आता पापडाच्या प्रत्येक तुकड्याचा कोन तयार करून, त्यात तयार केलेलं सारण व्यवस्थित भरा. आता मैद्याच्या मिश्रणाचा वापर करून पापडाच्या कडा बंद करा.
कढईत तेल गरम करत ठेवा. मंद आचेवर गरम तेलात समोसे सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम पनीर-पापड समोसे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.