मान्सून स्पेशल: पनीर स्टफ्ड चिली पकोडा आणि क्रि...

मान्सून स्पेशल: पनीर स्टफ्ड चिली पकोडा आणि क्रिस्पी मूगडाळ राइस पकोडा (Monsoon Special: Pakoda Recipes)

पनीर स्टफ्ड चिली पकोडा

साहित्य :  12 भावनगरी हिरव्या मिरच्या (उभी चिर देऊन त्यातील बिया काढून टाका), तळण्यासाठी तेल.

सारणासाठी : 1 कप कुस्करलेलं पनीर, दीड टीस्पून आलं-हिरवी मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून आमचूर पूड, चिमूटभर हळद पूड, स्वादानुसार मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

घोळ तयार करण्यासाठी : अर्धा कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ, चिमूटभर हळद पूड, 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून ओवा, 1 टीस्पून मोहनाकरिता तेल, स्वादानुसार मीठ, अर्धा कप पाणी.

कृती : सारणासाठीचं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून पाच मिनिटांसाठी झाकून ठेवा. वेगळ्या वाडग्यात घोळ तयार करण्यासाठीचं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्या.
आता सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित सारण भरून घ्या. तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. सारण भरलेल्या मिरच्या बेसनाच्या मिश्रणात घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम पनीर स्टफ्ड चिली पकोडा आंबट-गोड चटणीसोबत सर्व्ह करा.

क्रिस्पी मूगडाळ राइस पकोडा


साहित्य : पाव कप पिवळी मूगडाळ, पाव कप तांदूळ, पाव कप बारीक चिरलेल्या कांद्याच्या पाती, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : मूगडाळ आणि तांदूळ एकत्रित चांगले धुऊन, पूर्णतः निथळून घ्या. निथळलेल्या मूगडाळ-तांदळामध्ये 2 टेबलस्पून पाणी मिसळून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. आता या मिश्रणात तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य मिसळून, एकजीव मिश्रण तयार करा. कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात भज्याच्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे सोडून कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम क्रिस्पी मूगडाळ-राइस पकोडा हिरवी चटणी आणि चहासोबत सर्व्ह करा.