मान्सून स्पेशल चिकन पकोडा आणि एग चॉप्स (Monsoon...

मान्सून स्पेशल चिकन पकोडा आणि एग चॉप्स (Monsoon Special : Chicken Pakoda And Egg Chops)

चिकन पकोडा

साहित्य : 300 ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे बोनलेस तुकडे, दीड टीस्पून आलं-लसूण पेस्ट, दीड टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून हळद पूड, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, 1 अंडं, 1 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : चिकनचे तुकडे स्वच्छ करून धुऊन निथळून घ्या. एका वाडग्यात चिकनचे तुकडे, आलं-लसूण पेस्ट, लाल मिरची पूड, हळद, धणे पूड, काळी मिरी पूड आणि मीठ घेऊन व्यवस्थित एकजीव करा. नंतर त्यात बेसन आणि कॉर्नफ्लोअर घालून व्यवस्थित एकत्र करा. सर्व मसाला आणि चिकनला व्यवस्थित लागायला हवा. आता त्यात अंड फेटून घाला. मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करा. आता वाडग्यावर झाकण ठेवून ते मॅरिनेट होण्यासाठी 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्या.
नंतर एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करत ठेवा. गरम तेलात चिकनचे तुकडे एकमेकांना चिकटणार नाहीत अशा प्रकारे अलगद सोडा. चिकन शिजून कुरकुरीत झाल्यावर तेलातून बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवा आणि त्यातील जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम चिकन पकोडा हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
टीप : एका वेळी कढईत जास्त चिकनचे तुकडे तळण्यासाठी घालू नका.

 

एग चॉप्स

साहित्य : 3 उकडलेली अंडी, 6 उकडलेले बटाटे, 3 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, आवश्यकतेनुसार ब्रेड क्रम्स, 1 फेटलेलं अंडं, तळण्यासाठी तेल.
कृती : उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यात जिरं पूड, हळद, मिरची पूड, आलं-लसूण पेस्ट, मीठ, काळी मिरी पूड आणि कोथिंबीर घालून चांगलं एकजीव मिश्रण तयार करा. उकडलेली अंडी गोलाकार आडव्या चार भागांमध्ये चिरून घ्या.
एका बशीमध्ये ब्रेड क्रम्स आणि एका वाडग्यामध्ये फेटलेलं अंडं घ्या. कढईत तेल गरम करत ठेवा. आता अंड्याच्या प्रत्येक भागावर बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित पसरवून लावा. हे अंड सर्वप्रथम फेटलेल्या अंड्यात आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवा. ही अंडी गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम एग चॉप्स टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.