चीज पकोडा आणि राइस-चीज फ्र...

चीज पकोडा आणि राइस-चीज फ्रिटर्स (Monsoon Special: Cheese Recipes)

चीज पकोडा

साहित्य : 1 कप चीज क्यूब्स, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 कप बेसन, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून जिरं पूड, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चिमूटभर बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : तेल आणि चीज क्यूब्सव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घेऊन चांगलं एकजीव करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून दाट मिश्रण तयार करा. एका कढईत तेल गरम करत ठेवा. आता एक-एक चीज क्यूब बेसनाच्या दाट मिश्रणात घोळवून गरम तेलात अलगद सोडा. पकोडा सोनेरी रंगाचा झाला की, तेलातून बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवा. तेल निथळून गरमागरम चीज पकोडे हिरवी चटणी आणि टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.

राइस-चीज फ्रिटर्स

साहित्य : 1 कप अधिक प्रमाणात उकडलेला भात, 2 टेबलस्पून किसलेला चीज, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून उकडून बारीक चिरलेले गाजर, 2 टेबलस्पून फेटलेलं ताजं दही, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : एका वाडग्यात तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घेऊन, चांगलं एकजीव करून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करा. एका कढईत तेल गरम करत ठेवा. गरम तेलात भाताच्या मिश्रणाचे गोळे कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम राइस-चीज फ्रिटर्स चटणी किंवा मेयो डिपसोबत सर्व्ह करा.