मान्सून स्पेशल: बेक्ड ब्रेड समोसा आणि ब्रेड रोल...

मान्सून स्पेशल: बेक्ड ब्रेड समोसा आणि ब्रेड रोल (Monsoon Special: Bread Recipes)

बेक्ड ब्रेड समोसा

साहित्य : 8-10 ब्रेडचे स्लाइसेस, 1 टेबलस्पून तेल.
सारणासाठी : 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, 1 कप उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा कप उकडून कुस्करलेले मटार, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून आमचूर पूड, अर्धा टीस्पून धणे पूड, स्वादानुसार मीठ.

कृती : सारणासाठी : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिर्‍याची फोडणी करा. त्यात सारणासाठीचं सर्व साहित्य एकत्र करून एक-दोन मिनिटं परतवा. नंतर आच बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. ब्रेड स्लाइसच्या कडा कापून वेगळ्या करा. आता स्लाइसवरून लाटणं फिरवून चपटे करा. नंतर प्रत्येक स्लाइसला मध्ये चिर देऊन दोन त्रिकोणी भाग करा. स्लाइसचा प्रत्येक भाग दुमडून कोन तयार करा. त्यात सारण भरून कडा पाण्याचं बोट फिरवून चिकटवा. अशा प्रकारे सर्व समोसे तयार करून घ्या.
हे समोसे बेकिंग ट्रेमध्ये रचून ठेवा. त्यावर ब्रशच्या साहाय्याने तेल लावा. प्रीहिट ओव्हनमध्ये 200 डिग्री सेल्सिअसवर समोसे दहा मिनिटांकरिता बेक करा. बेक करायचे नसल्यास हे समोसे गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम ब्रेड समोसे हिरवी चटणी आणिटोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.

ब्रेड रोल

साहित्य : 5-6 ब्रेडचे स्लाइस, 2 मध्यम आकाराचे बटाटे, अर्धा टीस्पून आमचूर पूड, प्रत्येकी पाव टीस्पून काळी मिरी पूड, लाल मिरची पूड, गरम मसाला व जिरेपूड, 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली), अर्धा टीस्पून चाट मसाला, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.

कृती : बटाटे उकडून चांगले कुस्करून घ्या. त्यात आमचूर पूड, काळी मिरी पूड, लाल मिरची पूड, गरम मसाला, जिरेपूड, हिरवी मिरची, चाट मसाला, कोथिंबीर व मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करून घ्या. ब्रेडची स्लाइस घेऊन पाण्यात भिजवून लगेच दाबून त्यातील पाणी काढून टाका. बटाट्याचं थोडं मिश्रण ब्रेड स्लाइसच्या मध्यभागी ठेवून, स्लाइस दुमडा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर, हे ब्रेड रोल त्यात सोनेरी रंगावर तळून घ्या. जास्तीचं तेल काढण्यासाठी भजी टिश्यू पेपरवर ठेवा. गरमागरम ब्रेड रोल टोमॅटो सॉस किंवा नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.