मिक्स नान आणि पनीर पसंदा (Mix Naan And Paneer P...

मिक्स नान आणि पनीर पसंदा (Mix Naan And Paneer Pasanda)

मिक्स नान

साहित्य : अर्धा वाटी वरीचं पीठ, अर्धा वाटी साबुदाण्याचं पीठ, अर्धा वाटी शिंगाड्याचं पीठ, 2 डाव साजूक तूप, अर्धा चमचा जिरेपूड, स्वादानुसार सैंधव.
कृती : साधारण 1 वाटी पाणी उकळवत ठेवा. त्यात मीठ व तूप घालून आच बंद करा. वरीचं, साबुदाण्याचं आणि शिंगाड्याचं पीठ एकत्र चाळून घ्या. त्यात जिरेपूड आणि गरम पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ तासाभरासाठी ओल्या रुमालात झाकून ठेवा. नंतर या पिठाचे त्रिकोणी नान लाटून, गरम तव्यावर थोडं तूप घालून भाजून घ्या.

पनीर पसंदा

साहित्य : अर्धा किलो पनीर, 2 चमचे हिरवं तिखट, दीड वाटी ताजं व घट्ट दही, अर्धा वाटी नारळाचं दाट दूध, 4 चमचे जिरे, 2 चमचे आलं-मिरची वाटण, पाव वाटी पुदिना-कोथिंबिरीची पानं, स्वादानुसार मीठ.
कृती : पनीर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे लांबट आकाराचे तुकडे करा. पनीरच्या तुकड्यांना मीठ व हिरवं तिखट चोळून ठेवा.
एका तव्यावर थोडं तेल गरम करून, त्यावर पनीर परतवून बाजूला ठेवून द्या. नंतर त्याच पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरं, मिरच्या व आलं परतवा. त्यात दही व बारीक चिरलेली पुदिना-कोथिंबिरीची पानं घालून मिश्रण चांगलं परतवून घ्या. नंतर त्यात नारळाचं दूध आणि पनीर घाला. मिश्रणाला एक उकळी आली की, लगेच आच बंद करा. नंतर त्यात मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. पनीर पसंदा गरमागरम नानसोबत सर्व्ह करा.
टीप : भेळीमध्ये हिरव्या रंगाचं तिखट असतं, तेच ते हे हिरवं तिखट. किराण्याच्या दुकानातून ते सहजच उपलब्ध होतं. घरी करायचे असल्यास, हिरव्या मिरच्या साधारण सुकवून (पिवळ्या रंगाच्या होऊ देऊ नका), मिक्सरमधून कोरडेच बारीक करून घ्या. नंतर हिरव्या मिरचीचं हे वाटण पुन्हा सुकवा आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवा.