मिनी पोटॅटो समोसा आणि पार्मेसन रोझमेरी पोटॅटो च...

मिनी पोटॅटो समोसा आणि पार्मेसन रोझमेरी पोटॅटो चिप्स (Mini Potato Samosa And Parmesson Rosemary Potato Chips)0

मिनी पोटॅटो समोसा

 

साहित्य : आवरणासाठी ः दीड कप मैदा, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

सारणासाठी :
3 बटाटे उकडून कुस्करलेले, 2 टेबलस्पून हिरवे वाटाणे उकडलेले, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 आल्याचा तुकडा बारीक चिरलेला, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिर्‍याची पूड, अर्धा टीस्पून आमचूर पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला पूड, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, तळण्यासाठी तेल.

इतर :
2 टीस्पून मैदा. मैद्यात थोडं पाणी मिसळून दाट मिश्रण तयार करा.

कृती :
आवरणासाठीचं सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून, त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून मऊ कणीक मळा. झाकून दहा मिनिटं बाजूला ठेवून द्या. सारण तयार करण्यासाठी, पॅनमध्ये 2 टीस्पून तेल गरम करून त्यात वाटाणे, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, बटाटे, मीठ, धणे पूड, जिरं पूड, आमचूर पूड, गरम मसाला, लाल मिरची पूड घालून परतवून घ्या.
आता मैद्याच्या कणकेची लहान आकाराची पोळी लाटून, त्याचे मधून दोन भाग करा. एक भाग घेऊन, त्याचा कोन तयार करा. त्यात 1 टीस्पून सारण भरून, कडा मैद्याचं मिश्रण लावून बंद करा. कढईत तेल गरम करून त्यात हे समोसे, मंद आचेवर सोनेरी रंगाचे व कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम मिनी पोटॅटो समोसा हिरवी चटणी आणि गोड चटणीसोबत सर्व्ह करा.

पार्मेसन रोझमेरी पोटॅटो चिप्स

साहित्य : 2 बटाटे, दीड टेबलस्पून रोझमेरी हर्ब्स बारीक चिरलेल्या, दीड कप पार्मेसन चीझ किसलेलं, आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑईल, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड.

कृती :
बटाटे धुऊन, त्याच्या पातळ चकत्या चिरून घ्या. टिश्यू पेपरवर बटाट्याच्या चकत्या पसरवून 15 मिनिटं सुकत ठेवा. आता एका वाडग्यात बटाट्याच्या चकत्या, ऑलिव्ह ऑईल, मीठ, काळी मिरी पूड आणि रोझमेरी हर्ब्स व्यवस्थित एकत्र करून घ्या. बेकिंग ट्रेमध्ये बेकिंग शीट लावून त्यावर ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्या. त्यावर बटाट्याचा थर पसरवून ओव्हनमध्ये 400 डिग्री सेल्सियसवर 40 मिनिटं बेक करा.

टीप :
बेकिंग करताना, शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना ट्रे ओव्हनमधून बाहेर काढून, त्यावर पार्मेसन चीझ भुरभुरून पुन्हा पाच मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवता येईल.