मँगो ट्रीट आणि मँगो डिलाइट (Mango Treat And Man...

मँगो ट्रीट आणि मँगो डिलाइट (Mango Treat And Mango Delight)

मँगो ट्रीट
साहित्य : 1 पाकीट डायजेस्टिव्ह बिस्कीट, 4 टेबलस्पून विरघळलेलं बटर.
सारणासाठी : 2 कप आंब्याचा गर, 1 कप दूध, अर्धा कप कंडेंस्ड मिल्क, 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च, 1 टेबलस्पून जिलेटिन, दीड कप दही, 2 कप कुस्करलेलं पनीर, अर्धा कप साखर, अर्धा टीस्पून मँगो इसेन्स.
सजावटीसाठी : 1 टेबलस्पून मँगो जेली, 1 कप फेटलेली गोड क्रीम.
कृती : बिस्किटं रवाळ वाटून घ्या. त्यात विरघळलेलं बटर मिसळून चांगलं फेटून घ्या. आता ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये हे बिस्किटांचं मिश्रण घालून एकसमान पसरवा आणि त्यावर थोडा दाब द्या. हा ट्रे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. जिलेटिन पाण्यात मिसळून थोडं गरम करा आणि सेट होण्यासाठी वेगळं ठेवून द्या. एका पॅनमध्ये दूध गरम करा. त्यात कंडेंस्ड मिल्क, साखर आणि कॉर्नस्टार्च मिसळून दाट होईपर्यंत उकळवा. नंतर आचेवरून खाली उतरवून थंड होऊ द्या. मिक्सरमध्ये दही आणि पनीर घालून ब्लेंड करा. हे मिश्रण एका वाडग्यात काढून त्यात आंब्याचा गर, दुधाचं थंड मिश्रण, मँगो इसेन्स आणि जिलेटिनचं मिश्रण घालून चांगलं एकजीव करा. हे मिश्रण बिस्किटांचं मिश्रण सेट केलेल्या ट्रेमध्ये घालून एकसमान करा. हा ट्रे पुन्हा चार-पाच तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर याच्या वड्या पाडून अलगद ट्रेमधून काढा आणि सर्व्हिंग डिशमध्ये ठेवा. तयार मँगो जेली आणि क्रीमने सजावट करून थंडगार सर्व्ह करा.

मँगो डिलाइट
साहित्य : 1 प्लेन बेसिक आइस्क्रीम, अर्धा कप फ्रेश क्रीम, पाव टीस्पून मँगो इसेन्स, अर्धा टीस्पून खायचा लेमन यलो कलर, पाव टीस्पून खायचा नारिंगी रंग, 1-अडीच कप आंब्याचे तुकडे, 6-7 टेबलस्पून साखर.
कृती : आंब्याच्या फोडी बारीक वाटून घ्या. त्यात साखर मिसळून बाजूला ठेवून द्या. आइस्क्रीममध्ये फ्रेश क्रीम मिसळून हँड बीटरच्या साहाय्याने फेस येईपर्यंत फेटा. आता यात आंब्याचा गर मिसळून पुन्हा व्यवस्थित फेटा. त्यात लेमन यलो व नारिंगी रंग मिसळून प्लॅस्टिकच्या डब्यात भरा आणि झाकण लावून फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
टीप : बेसिक आइस्क्रीम तयार करण्यासाठी, एका जाड बुडाच्या टोपात अर्धा लीटर कच्चं दूध, 1 टेबलस्पून जीएमएस पावडर, चिमूटभर सीएमसी, 7 टेबलस्पून साखर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेऊन चांगलं एकजीव करा. हे मिश्रण मोठ्या आचेवर सतत ढवळत गरम करा. मिश्रणाला एक उकळी आली की, आच मंद करून पाच मिनिटं शिजवा. नंतर हे मिश्रण आचेवरून खाली उतरवून पूर्णतः थंड होऊ द्या. नंतर हे मिश्रण स्वच्छ हवाबंद डब्यात भरून झाकण लावून फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.