मँगो व्हेनिला पुडिंग, केक आणि हलवा (Mango Recip...

मँगो व्हेनिला पुडिंग, केक आणि हलवा (Mango Recipe : Pudding, Cake And Halwa)

मँगो व्हेनिला पुडिंग
साहित्य : 2 आंब्यांचा रस, 4 कप दूध, 2 टेबलस्पून जिलेटिन, 250 ग्रॅम फ्रेश क्रीम, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप साखर, 2 स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, सजावटीसाठी आंब्याचे स्लायसेस, 1-2 पुदिन्याची पानं.
कृती : एका वाडग्यामध्ये 1 कप दूध आणि जिलेटिन यांचं एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण 15 मिनिटं वेगळं ठेवून द्या. एका वेगळ्या पॅनमध्ये उर्वरित दूध आणि फ्रेश क्रीम मिसळून गरम करा. त्यात व्हॅनिला इसेन्स आणि साखर मिसळून मंद आचेवर शिजवा. त्यात जिलेटिनचं मिश्रण घालून एक-दोन मिनिटं आणखी शिजवा. नंतर हे मिश्रण आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. हे मिश्रण एका डब्यात भरून झाकण लावून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
मिक्सरमध्ये आमरस आणि व्हॅनिला आइस्क्रीम घालून ब्लेंड करून घ्या. सर्व्हिंग बाऊलमध्ये सर्वप्रथम आइस्क्रीमचं मिश्रण घालून, त्यावर थंडगार पुडिंग घाला. त्यावर आंब्याचे स्लाइस ठेवून त्यावर पुदिन्याची पानं ठेवा आणि सर्व्ह करा.

मँगो हलवा
साहित्य : 1 कप रवा, 1 कप आंब्याच्या बारीक फोडी, 1 कप साखर, पाव कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन, 6 टेबलस्पून तूप, पाव कप काजूचे तुकडे, 3 कप पाणी.
कृती : पाण्यात आंब्याच्या फोडी आणि साखर मिसळून चार-पाच मिनिटं शिजवून घ्या. आंब्याच्या फोडी विरघळून एकजीव मिश्रण तयार व्हायला हवं. आता कढईमध्ये तूप गरम करून, त्यात रवा, गव्हाचं पीठ आणि बेसन सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजा. नंतर त्यात काजू आणि आंब्याचं मिश्रण घालून मिश्रण दाट होईपर्यंत ढवळा. मँगो हलवा गरमागरम सर्व्ह करा.

एगलेस मँगो केक
साहित्य : दीड कप गव्हाचं पीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 100 ग्रॅम बटर, 200 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 1 कप आमरस, 3-4 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून व्हेनिला इसेन्स.
कृती : ओव्हन 180 डिग्री सेल्सियसवर 15 मिनिटं प्रीहिट करा. गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र चाळून बाजूला ठेवून द्या. एका वाडग्यामध्ये बटर, आमरस, कंडेंस्ड मिल्क, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र हलकं होईपर्यंत फेटून घ्या. त्यात गव्हाचं पीठ मिसळून पुन्हा एकाच दिशेने फेटा. हे मिश्रण ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये घालून एकसमान पसरवा. हा ट्रे प्रीहिटेड ओव्हनमध्ये ठेवून 40 मिनिटं बेक करा.