आंब्याचा पॅनकेक, कुल्फी आणि...

आंब्याचा पॅनकेक, कुल्फी आणि सालसा (Mango Pancake, Kulfi And Salsa)

मँगो पॅनकेक


साहित्य : (केकसाठी) : 2 कप आंब्याच्या फोडी, 1 कप क्रीम चीझ, अर्धा कप मध, 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, 1 कप ओट्स (बारीक केलेले), 1 टीस्पून बेकींग पावडर.
साहित्य (ड्रेसिंगसाठी) : 1 कप आंब्याच्या फोडी, 2 टेबलस्पून मध, 1 टेबलस्पून पाणी.
कृती : 2 कप आंब्याच्या फोडी, क्रीम चीझ, मध, व्हॅनिला इसेन्स ब्लेंडरने एकजीव करून त्याची मऊ पेस्ट बनवा. ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढा. त्यात ओट्स पावडर आणि बेकिंग पावडर घालून नीट मिसळा.
आता नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करा. त्यावर हे मिश्रण गोलाकार पसरवा. दोन्ही बाजूंनी तपकिरी रंग येईपर्यंत भाजा. त्यानंतर बाजूला काढून ठेवा.
1 कप आंब्याच्या फोडी, मध आणि पाणी एकत्र ब्लेंड करून हे मिश्रण ड्रेसिंग म्हणून केकवर शिंपडा.

 

कुल्फी इनसाइड मँगो


साहित्य : 2 पिकलेल्या आंब्याच्या फोडी, 2 कप दूध, 1 कप कंडेन्स्ड मिल्क, 400 ग्रॅम क्रीम, बदाम आणि पिस्त्याचे काप, 4 ताजे आंबे.
कृती : मिक्सरच्या जारमध्ये आंब्याच्या फोडी, दूध, कंडेन्स्ड मिल्क, क्रीम सर्व एकत्र करा आणि एकदा फिरवून घ्या. ‘कुल्फी इनसाईड मँगो’ करण्यासाठी 4 ताज्या आंब्याची देठं काढून टाका. आंबा मऊ करून त्यातील कोय आणि रस काढा. या आंब्यांना पोकळ केल्यानंतर एक एक आंबा घेऊन त्यामध्ये तयार केलेले मिश्रण आणि बदाम, पिस्त्याचे काप
भरा आणि आंब्याच्या सालीनं आंब्याचं तोंड बंद करा.
रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. खाण्यासाठी घेताना फ्रिजमधून काढून 5 मिनिटे कोमट पाण्यात ठेवा. नंतर योग्य आकारात स्लाइस कापा आणि ‘कुल्फी इनसाईड मँगो’ची मजा लुटा.

 

मँगो सालसा


साहित्य : अर्धा कप काकडीच्या फोडी, पाव कप बारीक चिरलेला कच्चा कांदा, अर्धा कप आंब्याच्या फोडी, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 टेबलस्पून लिंबू रस, 1 टेबलस्पून आंबा प्युरी, चवीपुरते मीठ, 1 टीस्पून जलापेनो किंवा काळी मिरी पावडर.
कृती : सर्व साहित्य एका बाऊलमध्ये नीट एकत्र करून सॅलड म्हणून सर्व्ह करा.
पार्टीमध्ये चिप्सबरोबर मँगो सालसा सर्व्ह करा.