महाशिवरात्री स्पेशल उपवासाच्या ५ रेसिपीज् (Maha...

महाशिवरात्री स्पेशल उपवासाच्या ५ रेसिपीज् (Mahashivratri Special : 5 Fasting Recipes)

महाशिवरात्रीचा दिवस उपवास करण्याचा दिवस. अलीकडे तरुण मंडळीदेखील उपवास करू लागलीत, तेवढंच वजन कमी झालं तर झालं… परंतु शरीराची हालचाल न करता उपवासाच्या नावाखाली चुकीचे पदार्थ खाणं वा अगदीच काहीही न खाणं ह्या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या व वजनाच्या दृष्टीनेही हानिकारकच आहेत. त्यापेक्षा दिवसभर थोडं थोडं खाल्लं पाहिजे अन् शरीराला व्यायामही दिला पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात. तेव्हा नव्याने उपवास करणार्‍या मंडळींसाठी काही नव्या रेसिपी…
मखाने की खीर
साहित्य : 1 लीटर दूध, पाव कप मखाना, 2 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून पिस्ता बारीक करून, 2 टीस्पून बदाम बारीक करून, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : एका पसरट भांड्यामध्ये दूध गरम करत ठेवा. आता मखाने बारीक कापून ते दुधामध्ये घाला. ते दूध 1-2 तास मंद आचेवर उकळू द्या. दूध आटून घट्ट आणि अर्धे झाल्यावर त्यात साखर घाला. आता गॅस बंद करा. खीर थंड होऊ द्या. मग सर्व्ह करा.

शिंगाड्याचा समोसा
साहित्य : 120 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, पाव कप आरारुट पावडर, 60 ग्रॅम तूप, अडीच कप पाणी, 1 टीस्पून सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
सारणासाठी : 125 ग्रॅम चारोळी (2 तास पाण्यात भिजवून ठेवा), पाऊण टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून जिरं, 2 टीस्पून धनेपूड, 2 टीस्पून सैंधव मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, 30 ग्रॅम तूप.
कृती : भिजवलेल्या चारोळीची सालं काढून ती मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून ते गरम होऊ द्या. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की त्यात चारोळीची पेस्ट आणि उरलेले सर्व साहित्य घाला. मंद आचेवर ठेवून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होऊ द्या. नंतर खाली उतरवून थंड करा.
समोसा कव्हर बनविण्यासाठी : एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात तूप आणि 1 टीस्पून मीठ घाला आणि उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्यात शिंगाड्याचं पीठ आणि आरारुट पावडर घाला आणि नीट एकत्र करा. मंद आचेवर ठेवून ते पीठ चांगले एकजीव होऊ द्या. नंतर गॅस बंद करा आणि पीठ चांगलं मळून घ्या. पीठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. गोळ्याची पुरी लाटा व तिचे दोन समान भाग कापा. एका भागाच्या सपाट बाजूला पाण्याचं बोट लावा आणि दोन्ही कडा एकत्र जुळवून त्याचा कोन बनवा. कोनमध्ये तयार सारण भरून कोन बंद करा. सर्व गोळ्यांचे असे समोसे बनवून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम होऊ द्या आणि त्यात समोसे सोनेरी रंग येईस्तोवर तळा. गरमगरम समोसा सर्व्ह करा.

उपवासाचे पनीर रोल
साहित्य : 2 बटाटे उकडलेले, 2 कप पनीर स्मॅश करून, 1 हिरवी मिरची, अर्धा टीस्पून आलं, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून सैंधव मीठ, 7-8 मनुका, 1 टीस्पून काळी मिरीपूड, 1 टीस्पून वेलची पूड, चिमूटभर सुका मेवा, 2 टीस्पून कोथिंबीर, 2 टीस्पून तूप.
कृती : उकडलेले बटाटे आणि स्मॅश केलेलं पनीर एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यात चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची घाला. ते एकत्र मिसळून घ्या. नंतर त्यात जिरे पूड, सैंधव, मनुका, मिरीपूड, वेलची पूड, सुका मेवा आणि चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व एकत्र मळून त्याचा पीठासारखा घट्ट गोळा बनवा. आता त्या मिश्रणाचे लांबट आकाराचे रोल बनवा. एका पॅनमध्ये तूप लावून हे रोल त्यावर शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग झाला की तयार पनीर रोल सर्व्ह करा.

केळ्याचे कबाब
साहित्य : 250 ग्रॅम कच्ची केळी (सोलून चौकोनी आकारात कापून घ्या), 1 मोठी वेलची, पाव कप शिंगाड्याचं पीठ, 2 टीस्पून सैंधव मीठ, 2 टीस्पून धनेपूड (भाजलेले धणे),अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून लिंबाचा रस, 1 हिरवी मिरची चिरून, 2 टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
कृती : कच्ची केळी सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. नंतर हे केळ्याचे तुकडे, आलं आणि वेलची पाणी गरम करून त्यात वाफवून घ्या. नंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर केळी स्मॅश करून घ्या. त्यात शिंगाड्याचं पीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून एकत्र करा. शेवटी हिरवी मिरची घाला. आता या सर्व मिश्रणाचा कणकेसारखा गोळा बनवा. त्याचे मध्यम आकाराचे गोल बनवून त्यास कबाबचा आकार द्या. नंतर मंद आचेवर पॅनमध्ये हे कबाब दोन्ही बाजूने तुपामध्ये खरपूस शेकून घ्या. एका टिश्यू पेपरवर ते काढा आणि गरमगरम सर्व्ह करा.

साबुदाणा भेळ
साहित्य : अर्धा कप साबुदाणा, 1 बटाटा (तुकड्यांत कापलेला), चिमूटभर लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून शेंगदाणे, 1 टेबलस्पून काजू, 1 टीस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून तेल, चवीनुसार सैंधव मीठ.
सजावटीसाठी : चिरलेली कोथिंबीर.
कृती : साबुदाणा व्यवस्थित धुऊन घ्या नि त्यात पाणी घालून 2 ते 3 तास भिजवून ठेवा. मंद आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाले की त्यात बटाट्याचे तुकडे तळून घ्या. ते तपकिरी रंगाचे झाले की एका ताटामध्ये काढून घ्या. नंतर त्याच पॅनमध्ये शेंगदाणे आणि काजूही तळून घ्या नि भांड्यात काढून ठेवा. आता पुन्हा पॅनमध्ये थोडं तेल घाला. तेल गरम झालं की त्यात साबुदाणा घाला. हा साबुदाणा मऊ झाला की त्यात तळलेले बटाट्याचे तुकडे, शेंगदाणे, काजू, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून 1 मिनिट शिजवा. नंतर आच बंद करा. शेवटी साबुदाण्यामध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार साबुदाणा भेळ कोथिंबीरने सजवा. आणि मग सर्व्ह करा.

स्नॅक्स रेसिपीज