खिमा अ‍ॅण्ड एग रोटी (Kheema And Egg Roti)

खिमा अ‍ॅण्ड एग रोटी (Kheema And Egg Roti)

साहित्य : 3 अंडी फेटलेली, अर्धा किलो मळलेली कणीक आणि बटर.
खिमा बनविण्यासाठी लागणारे साहित्य : अर्धा किलो खिमा, 3 छोटे कांदे कापलेले, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला, 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 टोमॅटो बारीक चिरून, 1 टीस्पून जिरे, 1 छोटा तुकडा दालचिनी, 1 लवंग,  1 वेलची, 2 तमालपत्र,  1-1 टीस्पून लाल तिखट, गरम मसाला, अर्धा-अर्धा टीस्पून धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला व आमचूर पावडर, 1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडेसे दही, 2 टीस्पून पाणी, 4 अंडी थोडे मीठ घालून फेटलेली, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार,   सजवण्यासाठी थोडे बारीक चिरलेले कांदे, व कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला चवीनुसार
कृती : खिमा नीट धुवून गाळून घ्या, त्यातील पाणी पूर्णपणे गाळून घ्या. आता एका प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात लवंग, तमालपत्र, दालचिनी व वेलची घाला. त्यात जिरे आणि कांदे घालून ते तपकिरी होईपर्यंत परता. आले आणि लसूण घालून परतवा. त्यात टोमॅटो घालून शिजवा. त्यात मीठ लाल तिखट आणि खिमा घालून तपकिरी होईपर्यंत शिजवा. आता त्यात हिरवी मिरची, गरम मसाला, धणे पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, आमचूर घालून थोडा वेळ शिजू द्या. त्यात दही घालून व्यवस्थित ढवळून घ्या. शेवटी कोथिंबीर आणि पाणी घालून एक शिटी करा.  नंतर खिमा 8 मिनिटं मंद आचेवर शिजवा. कुकर थंड झाल्यावर खिमा अजून थोडा वेळ मंद आचेवर ढवळत राहून शिजवा. म्हणजे राहिलेले पाणी सुकून जाईल.
मळून ठेवलेल्या कणकेचे गोळे बनवून पराठे लाटून घ्या आणि बटर लावून शेकवा. आंचेवरून उतरवून थंड होऊ द्या. पराठ्याची किनार सैल करून वरचा बाजू उघडा त्यावर खिमा पसरवा आणि ती बाजू बंद करा. आता त्यास मंद आचेवर तव्यावर शेकवा. पराठ्यावर थोडं अंड घाला, एका बाजूला बटर घाला आणि हळूवारपणे पराठा पलटा. दुसर्‍या बाजूवर फेटलेले अंड घाला. बटर लावून शेकवा. पराठा सोनेरी आणि क्रिस्पी झाला की तव्यावरून खाली घ्या. त्यावर कांदा, मीठ लाल तिखट, आमचूर, चाट मसाला, कोथिंबीर घाला. हा पराठा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.