केशर-पनीर मोदक (Keshar – Paneer Modak)

केशर-पनीर मोदक (Keshar – Paneer Modak)

साहित्य : अर्धा कप ताजे पनीर, अर्धा कप दुधाची पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर (किंवा स्वादानुसार), स्वादानुसारवेलची पूड, थोड्या केशराच्या काड्या, 2-3 टेबलस्पून तूप.
कृती : पनीर चांगलं कुस्करून घ्या. ते मिक्सरमधून काही सेकंदासाठी फिरवूनही घेता येईल. एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये मंद आचेवर पनीर, दुधाची पावडर, दूध आणि केशराच्या काड्या घालून व्यवस्थित एकत्र करा. त्यात तूप घालून मिश्रणाचा दाट गोळा तयार होईपर्यंत सतत ढवळत राहा. मिश्रण भांड्याला चिकटत असल्यास मिश्रणात अजून थोडं तूप एकत्र करा. मिश्रण पिठाच्या गोळ्याएवढं घट्ट होईपर्यंत सतत ढवळत शिजवा. नंतर आच बंद करून ते थोडं थंड करून घ्या. साखर अगदी बारीक दळून घ्या. साधारण गरम असलेल्या पनीरच्या मिश्रणात ही दळलेली साखर व्यवस्थित एकत्र करा. नंतर मिश्रण चांगलं मळून घ्या. आवश्यकता असल्यास त्यात अजून दळलेली साखर घाला. ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण दाबून भरा आणि मोदक तयार करा. हे मोदक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करा आणि नंतर सर्व्ह करा.
टीप : पनीरच्या गरम मिश्रणात साखर एकत्र केल्यास, ती वितळून मिश्रण पातळ होईल. तेव्हा मिश्रण थंड झाल्यावरच त्यात साखर एकत्र करा.