कणकेचे मोदक आणि खिरापतीचे मोदक (Kankeche Modak ...

कणकेचे मोदक आणि खिरापतीचे मोदक (Kankeche Modak And Khirapatiche Modak)

कणकेचे मोदक


साहित्य : पारीसाठी : 1 वाटी गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ, 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन, आवश्यकतेनुसार पाणी.
सारणासाठी : 1 खोवलेला नारळ, 1 वाटी गूळ, स्वादानुसार वेलची पूड, थोडे काजू-बदामाचे काप व बेदाणे.
इतर : तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम केवळ नारळाचा चव थोडा परतून घ्या. नंतर त्यात गूळ, वेलची पूड, काजू-बदामाचे काप आणि बेदाणे घालून सारण एकजीव करून शिजवून घ्या.
कणकेत तेलाचं मोहन आणि मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि घट्ट पीठ मळून घ्या. कणीक चांगलं मळून, त्याचा लहानसा गोळा तळहातावर घ्या आणि त्याला खोलगट वाटीप्रमाणे आकार द्या. या पारीला समान अंतरावर चुण्या द्या. नंतर त्यात अंदाजे सारण भरून मोदक तयार करा. कढईत मध्यम आचेवर गरम तेलात मोदक सोनेरी रंगावर तळून घ्या.

खिरापतीचे मोदक


साहित्य : पारीसाठी : अर्धा कप मैदा, अर्धा कप बारीक रवा, 2 टेबलस्पून तेल, चिमूटभर मीठ, 1 टीस्पून दूध.
सारणासाठी ः पाऊण कप किसलेलं सुकं खोबरं, 1 टेबलस्पून खसखस, 150 ग्रॅम खडीसाखर, स्वादानुसार वेलची पूड, 6-7 बारीक पूड केलेल्या खारका, 8-10 बारीक पूड केलेले बदाम.
इतर : तळण्यासाठी तेल किंवा तूप.
कृती : मैदा आणि रवा एकत्र करून त्यात 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन आणि मीठ घालून एकत्र करा. नंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून, घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ साधारण अर्धा तास झाकून ठेवा.
सुकं खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. नंतर परातीत काढून ठेवा. खसखसही मंद आचेवर भाजून घ्या. नंतर खलबत्त्यात कुटून बारीक करा. बदाम आणि खारकांची पूड मध्यम आचेवर साधारण भाजून घ्या. खडीसाखर खलबत्त्यात कुटून घ्या. आता सारणाचं सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्या. ही खिरापत गणेशोत्सवादरम्यान प्रसाद म्हणून वाटली जाते.
मैदा-रव्याचं पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्या. नंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून, त्याची पुरी लाटा. या पुरीला चुण्या पाडून वाटी तयार करा. मध्यभागी चमचाभर सारण भरून मोदक तयार करा. मोदक व्यवस्थित बंद व्हावेत यासाठी त्याची कळी बंद करताना थेंबभर दूध लावा. गरम तेलात किंवा मंद आचेवर मोदक तळून घ्या.