गूळ पोळी (Jaggery Roti)

गूळ पोळी (Jaggery Roti)

गूळ पोळी

साहित्य : अर्धा किलो कोल्हापुरी (पिवळा) गूळ, अर्धा वाटी खसखस, अर्धा वाटी तीळ, 1 जायफळ, 1 वाटी तेल, अर्धा वाटी चण्याचं पीठ, 2 वाटी कणीक किंवा मैदा, चवीपुरतं मीठ, तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर, 2 चमचे तेलाचं मोहन.

कृती : गूळ किसणीवर किसून घ्या. तीळ, खसखस भाजून, कुटून घ्या. जायफळ किसून पूड करा. कढईत 1 वाटी तेल गरम करून त्यात चण्याचं पीठ खमंग भाजून घ्या. नंतर त्यात गूळ, तीळ, खसखस, जायफळ घालून व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करा. हे गुळाचं सारण कढईतच थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. गुळाचं सारण तयार केल्यानंतर 4-5 दिवसांनी गूळ पोळी बनवल्यास, अधिक स्वादिष्ट बनते. हे सारण खूप दिवस टिकतं. मैद्यामध्ये मीठ आणि मोहन घालून पाण्याने मैदा भिजवा. आपण नेहमी पोळीकरिता पीठ भिजवतो, त्याप्रमाणेच ही कणीक भिजवा. भिजवलेल्या मैद्याचे पेढ्याएवढे दोन गोळे करून, पुरीएवढे लाटून घ्या. मैद्याच्या एका गोळ्यापेक्षा थोडं जास्त सारण घेऊन ते दोन पोळ्यांमध्ये पसरवून सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करा.
या पुरीला दोन्ही बाजूंनी तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर लावून आतील गूळ पूर्ण कडेपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे पोळी लाटा. गरम तव्यावर ही गूळ पोळी दोन्ही बाजूने छान भाजून घ्या. नंतर ही पोळी कागदावर काढा. गूळ पोळी पूर्णतः थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा.
टीप :
= पोळी तयार करताना, अगदी कडेपर्यंत गूळ न गेल्यास, त्या कडा कापून वेगळ्या केल्या तरी चालेल.
= गूळ पोळी डब्यात भरून ठेवताना, शक्यतो प्रत्येक दोन पोळ्यांमध्ये कागद ठेवा.
= गूळ पोळीला तूप लावून खावं, म्हणजे गूळ बाधत नाही.