पुरण पोळी (Holi Special: Puran Poli)

पुरण पोळी (Holi Special: Puran Poli)

पुरण पोळी

साहित्य : 4 वाटी चणा डाळ, 3 वाटी गूळ, 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 चमचा मैदा, 1 वाटी तांदळाचे पीठ, अर्धा वाटी तेल.

कृती : गव्हाचे पीठ आणि मैदा एकत्र चाळून त्याचे एकदम मऊ पीठ भिजवा. हे पीठ स्टीलच्या भांड्यात ठेवून त्यात बोटांनी दाबून खड्डे करा. त्यात सर्व खड्डे भरतील इतके तेल घालून किमान दोन तासांकरिता हे पीठ तसेच ठेवून द्या. नंतर पुन्हा चांगले मळून घ्या. चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर चाळणीतून गाळून त्यातील जास्तीचे पाणी बाजूला काढून ठेवा. (या जास्तीच्या पाण्यालाच मडाळीचा कटफ म्हणतात. त्यासाठी मुद्दामहून जास्त पाणी घालून डाळ शिजवा.) कढईमध्ये शिजलेली चण्याची डाळ आणि गूळ घालून पूर्णतः कोरडी होईपर्यंत शिजवा. आवडत असल्यास त्यात वेलदोड्यांची वा जायफळ पूड घाला. हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्या. पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
पिठाचा लिंबाच्या आकाराचा आणि पुरणाचा त्याच्या दुप्पट आकाराचा गोळा तयार करा. पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करून त्यात पुरणाचा गोळा घालून बंद करा. हा गोळा हाताच्या तळव्यावर ठेवून अलगद दाबा. नंतर तांदळाचे भरपूर पीठ लावून पोळी लाटा. पोळी लाटताना अधूनमधून हातावर घेऊन पोळपाटाला चिकट नाही, याची खात्री करून घ्या. पोळी लाटतानाही त्यास मधूनमधून तांदळाचे पीठ लावत राहा. तवा अगदी मंद आचेवर गरम करा. पोळीवर तळहात ठेवून पोळपाट उलटे करा आणि ही पोळी अलगद गरम तव्यावर ठेवा. पोळी मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

टीप :
पोळी अगदी पातळ लाटता यावी, यासाठी पीठ लवचिक असायला हवे, म्हणूनच ते चांगले मऊ मळून घ्या.
पुरण पोळी प्रथम लहान लाटा. नंतर जमेल तसा तिचा आकारवाढवा.
पुरण पोळी तुटू नये किंवा पोळपाटाला चिकटू नये, यासाठी पोळीच्या गोळ्याला आणि पोळी लाटतानाही तांदळाचे भरपूर पीठ वापरा. हवे असल्यास पोळी लाटून झाल्यावर तव्यावर टाकण्यापूर्वी ते कमी करा.
पुरण पोळी कधीही बोटांनी उचलू नका.
पुरणापेक्षा पीठ जास्त झाले की, पोळीच्या कडांना अधिक पीठ दिसते. असे झाल्यास पुढची गोळी तयार करताना थोडे कमी पीठ वापरा.
पुरण पोळी लाटताना बाहेरच्या बाजूस लाटल्यास पोळीमध्ये सर्वत्र पुरण पसरते आणि आवरणही तुटत नाही.
पुरणामध्ये खवा घालायचा असल्यास, तो पुरण शिजवतानाच घाला. पोळी छान लागते.