गूळ पापडी (Gud Papadi)

गूळ पापडी (Gud Papadi)

गूळ पापडी

साहित्य : 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप किसलेला चिक्कीचा गूळ, 1 टेबलस्पून वेलची पूड, अर्धा कप साजूक तूप, 3 टेबलस्पून बटर.

कृती : एका कढईत तूप घालून गरम करत ठेवा. तूप थोडं गरम झालं की, त्यात गव्हाचं पीठ घालून लालसर भाजून घ्या. नंतर त्यात वेलची पूड मिसळून आच बंद करा. आता या मिश्रणात गूळ आणि बटर मिसळून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. आता ही कढई पुन्हा आचेवर ठेवून मिश्रण मंद आचेवर पाच ते सात मिनिटं परतवून घ्या. नंतर आच बंद करून दोन ते तीन मिनिटं चांगलं एकजीव करा. त्यामुळे ते थोडं थंडही होईल.
आता एका ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण घालून पसरवा. मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून, शंकरपाळीप्रमाणे वड्या पाडा. हा ट्रे किंवा ताट अर्धा तास तसंच ठेवा. नंतर गूळ पापडी सुटी करून घ्या. ही गूळ पापडी हवा बंद डब्यात भरून ठेवल्यास महिनाभर चांगली टिकते.

टीप :
* मिश्रण अगदी गरम असतानाच ट्रे किंवा ताटात घालून थापल्यास वड्या चिवट होतात.
* आच बंद केल्यानंतरच मिश्रणात गूळ मिसळा.