गटारी स्पेशल : झणझणीत मटण रेसिपीज (Gatari Speci...

गटारी स्पेशल : झणझणीत मटण रेसिपीज (Gatari Special : Tasty Mutton Recipes)

मटण-ए-पतियाला
साहित्य : अर्धा किलो मटणाचे बोनलेस तुकडे, 2-3 कप तूप, दीड कप कांदा, स्वादानुसार मीठ, 4 टीस्पून आल्याची पेस्ट, 4 टीस्पून लसणाची पेस्ट, 4 मोठ्या वेलच्या, 5 लवंगा, 2 काळी मिरी, 2 तमालपत्रं, 1 दालचिनीचा तुकडा, 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, 4 टीस्पून धणे पूड, 1 कप टोमॅटो, 1 मोठा आल्याचा तुकडा गोलाकार चकत्या केलेला, 4 टीस्पून जिरे पूड, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : एका मटक्यामध्ये तूप गरम करून त्यात कांदा, मीठ आणि मटणाचे तुकडे घालून मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतवा. त्यात आलं-लसूण पेस्ट आणि सर्व खडे मसाले घालून एक-दोन मिनिटं परतवा. नंतर त्यात 3 कप पाणी घालून मंद आचेवर झाकण लावून शिजवा. अधूनमधून मिश्रण ढवळत राहा. मटणाचे तुकडे मऊ झाल्यानंतर ते ग्रेव्हीमधून बाहेर काढा. आता ग्रेव्हीमध्ये लाल मिरची पूड, धणे पूड, हळद आणि टोमॅटो घालून, टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात पाव कप पाणी घालून मंद आचेवर शिजवा. छोट्या सळीवर दोन मटणाचे तुकडे रोवून, एक आल्याची चकती रोवा आणि पुन्हा मटणाचे दोन तुकडे रोवा. अशा प्रकारे उर्वरित मटणाचे तुकडेही सळ्यांमध्ये रोवून घ्या. या सर्व सळ्या ग्रेव्हीमध्ये सोडा. हे मिश्रण पाच ते सात मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. नंतर त्यात जिरं पूड मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करून एक उकळी काढा. शेवटी त्यावर कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम मटण-ए-पतियाला तंदुरी पराठ्यासोबत सर्व्ह करा.
Tasty Mutton Recipes

मटण खिचडा
साहित्य : अर्धा किलो बोनलेस मटणाचे अर्धा इंच आकाराचे तुकडे, अर्धा कप लापशी (भिजवलेली), 2 टीस्पून उडीद डाळ, 2 टीस्पून चणा डाळ, 2 टीस्पून मूग डाळ (तिन्ही डाळी स्वच्छ धुऊन भिजवलेल्या), 1 कप दही, स्वादानुसार मीठ, 5 कांदे उभे पातळ चिरलेले, 1 टीस्पून हिरवी मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टीस्पून गरम मसाला पूड, 1 टीस्पून शहाजिरं, 1 टीस्पून काळी मिरी, चिमूटभर हळद, 6 कप मटण स्टॉक, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, पाव कप साजूक तूप, 3 लिंबाचे तुकडे, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : दह्यात मीठ मिसळून मटणाला लावा आणि तासभर मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या. निथळून बाजूला ठेवून द्या. तळलेला कांदा, लिंबाचे तुकडे आणि पुदिना सोडून मॅरिनेट केलेल्या चिकनसह उर्वरित सर्व साहित्य कुकरमध्ये घालून झाकण लावून 30-40 मिनिटं शिजवा. नंतर आचेवरून उतरवून 10 मिनिटांकरिता असंच ठेवून द्या. त्यानंतर झाकण काढून त्यातील मटणाचे तुकडे बाहेर काढा. डाळी स्मॅश करून प्युरी करा. नंतर त्यात मटणाचे तुकडे परत घालून चांगलं एकजीव करा. दुसर्‍या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खिचडा घालून व्यवस्थित एकत्र करा आणि 10 मिनिटं शिजवा. त्यावर तळलेले कांदे, लिंबाच्या फोडी आणि कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Tasty Mutton Recipes

खिमा पराठा
साहित्य : 250 ग्रॅम मैदा किंवा गव्हाचं पीठ, 150 ग्रॅम खिमा, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला पूड, 1 कांदा उभा पातळ चिरलेला, थोडी पुदिन्याची पानं, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 4 टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : मैदा किंवा गव्हाच्या पिठात 1 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून कणीक मळून घ्या. एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करा. त्यात कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट, लाल मिरची पूड, हळद पूड आणि गरम मसाला पूड घालून मिनिटभर परतवा. मिश्रणाला तेल सुटलं की, त्यात खिमा घालून पाच-सहा मिनिटं सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतवा. त्यात अर्धा कप पाणी मिसळून झाकण लावा आणि सहा-सात मिनिटं शिजवा. नंतर सारण आचेवरून उतरवून पूर्णतः थंड होऊ द्या. कणकेच्या गोळ्या बनवून, त्याची वाटी तयार करा आणि त्यात सारण भरून पुन्हा गोळी तयार करा. या गोळीचे पराठे लाटून घ्या. गरम तव्यावर मंद आचेवर हे पराठे दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत शेकून घ्या. उभा पातळ चिरलेल्या कांद्यामध्ये लिंबाचा रस आणि पुदिन्याची पानं एकत्र करा. गरमागरम खिमा पराठ्यासोबत कांद्याचं सॅलेड आणि दही सर्व्ह करा.
Tasty Mutton Recipes