गटारी स्पेशल : चमचमीत चिकन रेसिपीज् (Gatari Sp...

गटारी स्पेशल : चमचमीत चिकन रेसिपीज् (Gatari Special : Spicy Chicken Recipes)

भरवा मूर्ग तंगडी
साहित्य : 6-8 चिकन ड्रमस्टिक्स, 150 ग्रॅम चिकन खिमा, 1 कांदा बारीक चिरलेला, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर (थोड्या पाण्यात मिसळलेलं), थोडा ब्रेडचा चुरा, तळण्यासाठी तेल, स्वादानुसार मीठ, सजावटीसाठी काही कांद्याच्या चकत्या.
कृती : चिकन ड्रमस्टिक्स स्वच्छ धुऊन निथळून घ्या. त्यावर मीठ आणि आलं-लसणाची पेस्ट व्यवस्थित चोळून, दोन तासांकरिता मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. सारण तयार करण्यासाठी, एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवा. गरम तेलावर कांदा घालून सोनेरी रंगावर परतवून घ्या. त्यावर चिकनचा खिमा, लाल मिरची पूड, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित परतवा. खिमा पूर्णतः कोरडा होईपर्यंत मिश्रण परतवा. आता त्यात लिंबाचा रस मिसळून आचेवरून उतरवा. आता ड्रमस्टिक्सच्या पॉकेट्समध्ये सारण भरून, ती सर्वप्रथम कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणात आणि नंतर ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवा. गरम तेलात हे ड्रमस्टिक्स सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम भरवा मूर्ग तंगडी ऑनियन रिंग्सने सजवून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Spicy Chicken Recipes

 

कढई चिकन
साहित्य : मॅरिनेशनसाठी : 400 ग्रॅम बोनलेस चिकनचे तुकडे, 1 टेबलस्पून ताजं दाट दही, पाव टीस्पून काळी मिरी पूड, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धणे पूड, पाव टीस्पून आल्याची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून कसुरी मेथीची पूड.
ग्रेव्हीसाठी : 1 टेबलस्पून तेल, पाव टीस्पून आल्याची पेस्ट, पाव टीस्पून हळद, 4 उकडलेल्या कांद्यांची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, अर्धा टीस्पून गरम मसाला पूड, अर्धा टीस्पून कसुरी मेथी पूड, 4 टोमॅटोंची प्युरी, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम, 2 सिमला मिरची, 3 कांदे (सिमला मिरची आणि कांदे 1 टेबलस्पून तेलात परतवून घ्या).
कृती : मॅरिनेशनचं सर्व साहित्य एका वाडग्यात चांगलं एकजीव करा. हे मिश्रण चिकनच्या तुकड्यांना चोळून मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, आलं आणि लसणाची पेस्ट घालून सोनेरी रंगाची होईपर्यंत परतवून घ्या. त्यात सर्व सुक्या मसाल्यांची पूड, मीठ आणि टोमॅटो प्युरी घालून परतवा. मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतवा. नंतर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून, झाकण लावून शिजत ठेवा. चिकन व्यवस्थित शिजवून घ्या. आवश्यकता भासल्यास आणखी पाणी घाला. ग्रेव्ही दाट झाल्यावर त्यात कांदा आणि सिमला मिरची घालून, मिरची नरम होईपर्यंत शिजवा. शेवटी वरून फ्रेश क्रीम घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Spicy Chicken Recipes

 

स्टिर फ्राइड चिकन मॅजिक बॉल्स
साहित्य : 1 पाकीट चिकन बॉल्स, 50 ग्रॅम कांद्याचे चौकोनी तुकडे, 50 ग्रॅम हिरव्या सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे, 50 ग्रॅम लाल सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे, 50 ग्रॅम पिवळ्या सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे, 50 ग्रॅम बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 20 ग्रॅम बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 20 ग्रॅम बारीक चिरलेला गाजर, 30 ग्रॅम टोमॅटो केचअप, 5 मिलिलीटर डार्क सोया सॉस, स्वादानुसार मीठ, 1 ग्रॅम काळी मिरी पूड, 1 टीस्पून व्हिनेगर, 1 टेबलस्पून मध, 2 टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तेल, अर्धा कप पाणी, 10 ग्रॅम कॉर्न स्टार्च, सजावटीसाठी बारीक चिरलेल्या कांद्याच्या पाती.
कृती : चिकन बॉल्स गरम तेलात तळून घ्या आणि निथळण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवून द्या. आता एका कढईत तेल गरम करा. त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून परतवा. त्यात गाजर, सिमला मिरची आणि कांदा घालून परतवा. त्यात टोमॅटो केचअप, मीठ, काळी मिरी पूड, सोया सॉस आणि व्हिनेगर परतवा. कॉर्न स्टार्च पाण्यात मिसळून त्यात घाला. आता त्यात तळलेले चिकन बॉल्स घालून मोठ्या आचेवर परतवा. शेवटी त्यात मध आणि कांद्याची पात घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Spicy Chicken Recipes