उकडीचे मोदक (Favorite Offering To Lord Ganesha ...

उकडीचे मोदक (Favorite Offering To Lord Ganesha : Ukadiche Modak)

साहित्य : पारीसाठी : 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप पाणी, अर्धा कप दूध, 1 चमचा साखर, पाव चमचा मीठ, 2 चमचे तेल किंवा लोणी.
सारणासाठी : 2 कप नारळाचा चव, 1 कप गूळ, अर्धा कप साखर, 2 चमचे भाजलेल्या खसखशीची पूड, थोडा भाजलेला खवा, स्वादानुसार वेलची-जायफळ पूड.
कृती : दूध, पाणी, साखर, मीठ आणि तेल एकत्र करून उकळी येऊ द्या. आता त्यात तांदळाचं पीठ घालून झटपट ढवळत राहा. उकड पूर्णपणे न शिजवता लगेच झाकून ठेवा. उकड गरम राहण्यासाठी एका मोठ्या भांड्यात थोडं गरम पाणी घालून त्यात उकडीचं भांडं ठेवा आणि झाकण बंद करा. उकडीत गुठळ्या झाल्या असल्यास, ती पुरणयंत्रातून फिरवून घ्या. आता हवी तेवढी उकड घेऊन तेल व पाणी लावून मळा आणि त्याचे तीन-चार गोळे बनवा. उकड थंड झाल्यास पारीला कडेने चिरा पडतात, म्हणून मोदक होईपर्यंत उकड गरमच राहील याची काळजी घ्या. सर्वप्रथम केवळ नारळाचा चव थोडा परतून घ्या. नंतर त्यात गूळ, साखर, खसखस, वेलची-जायफळ पूड आणि खवा घालून सारण एकजीव करून घ्या. आता तांदळाच्या उकडीचा गोळा तळहातावर घेऊन त्याला खोलगट वाटीप्रमाणे आकार द्या. या पारीला चुण्या द्या. या चुण्यांमधील अंतर समान असायला हवं. यामुळे मोदक सुबक दिसतात. त्यात अंदाजे सारण भरून मोदक तयार करा. पातेल्यात पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. यावर चाळणी ठेवा. चाळणीत तुपाचा हात लावलेली केळीची पानं ठेवून त्यावर मोदक ठेवा. मोदक दहा-बारा मिनिटं वाफवा.
टीप :
–    नारळाच्या चवाचं प्रमाण नेहमी तांदळाच्या पिठाच्या दुप्पट असायला हवं.
–    सारण तयार करताना, सर्वप्रथम केवळ नारळाचा चव थोडा परतून घेऊन नंतर त्यात गूळ घातला, तर गुळाला पाणी सुटत नाही आणि सारण खमंग बनतं.
–    मोदक वाफवताना, पात्रात केळीच्या पानाऐवजी हळदीचं पान ठेवल्यास, मोदकांना छान सुगंध येतो.
–    तसंच तुपाऐवजी लोणकढं तूप वापरल्यास मोदक अधिक चांगले बनतात.