शिंगाडा-साबुदाणा शेव आणि खडखडीत चकली (Fasting S...

शिंगाडा-साबुदाणा शेव आणि खडखडीत चकली (Fasting Sev And Chakali Recipe)

शिंगाडा-साबुदाणा शेव

साहित्य : 1 वाटी साबुदाण्याचं पीठ, 1 वाटी शिंगाड्याचं पीठ, 4 चमचे हिरवं वाटण (कोथिंबीर-आलं-मिरची), 1 डाव तेलाचं मोहन, स्वादानुसार सैंधव, तळण्यासाठी तेल.
कृती ः मीठ व दोन्ही पीठं एकत्र चाळून घ्या. त्यात कडकडीत तेलाचं मोहन आणि हिरवं वाटण एकत्र करा. नंतर त्यात पाव वाटी कोमट पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ तासाभरासाठी ओल्या रुमालात झाकून ठेवा.
एका पसरट कढईत तेल गरम करत ठेवा. पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्या आणि शेव तयार करण्याच्या साच्याच्या साहाय्याने गरमागरम तेलात शेव हळुवार घाला. शेव खमंग तळल्यानंतर पेपरवर काढा. ही शेव हवाबंद डब्यात भरून ठेवा.

खडखडीत चकली

साहित्य : 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धा वाटी केळ्याचं पीठ, 2 वाटी उकडलेल्या बटाट्याचा कीस, 8-10 हिरव्या मिरच्या, 3-4 चमचे जिरं, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : मिरच्या व जिरे जाडसर कुटून घ्या. साबुदाणा व बटाटा एकत्र कुस्करा. त्यात मीठ व वाटण घालून एकजीव करा. त्यात केळ्याचं पीठ घाला. थोडा तेलाचा हात लावून, या मिश्रणाचं घट्ट पीठ मळा. जाड प्लॅस्टिकच्या (दुधाची पिशवी इत्यादी) पिशवीला तेलाचा हात लावून घ्या. त्या पिशवीला कोनाकडे लहानसं छिद्र पाडा. एका कढईत तेल गरम करा. आता या पिशवीत पीठ भरून (मेंदी कोनाप्रमाणे) थेट गरम तेलातच हळुवार चकल्या पाडा. चकल्या खमंग तळून घ्या.