कॉफी आइस्क्रीम, स्ट्रॉबेरी फ्लोट, थंडाई कुल्फी ...

कॉफी आइस्क्रीम, स्ट्रॉबेरी फ्लोट, थंडाई कुल्फी (Enjoy Ice Cream And Kulfi This Season)

कॉफी आइस्क्रीम
साहित्य : अर्धा कप दूध, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा कप साखर, दीड टेबलस्पून इंस्टंट कॉफी पावडर, पाऊण कप फ्रेश क्रीम, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : 1 टेबलस्पून गरम पाण्यात कॉफी पावडर मिसळून बाजूला ठेवून द्या. आता दुसर्‍या बाऊलमध्ये अर्धा कप दूध आणि कॉर्नफ्लोअर एकजीव करून ठेवा. आता एका पॅनमध्ये उर्वरित दूध गरम करत ठेवा. त्यास साखर मिसळून पाच-सहा मिनिटं उकळवा. मिश्रण सतत ढवळत राहा. आता त्यात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण मिसळून पाच मिनिटं सतत ढवळत शिजवा. नंतर त्यात कॉफीचं मिश्रण मिसळून मिनिटभर ढवळत शिजवा. आता हे मिश्रण आचेवरून खाली उतरवा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतर त्यात फ्रेश क्रीम आणि व्हेनिला इसेन्स घालून चांगलं एकजीव करा. अ‍ॅल्युमिनिअमच्या आइस्क्रीम कंटेनरमध्ये हे मिश्रण घालून एकसमान करा आणि सहा-सात तास फ्रीजरमध्ये सेमी सेट होण्यासाठी ठेवून द्या. नंतर हे मिश्रण फ्रीजरमधून बाहेर काढून ब्लेंडरने स्मूद होईपर्यंत ब्लेंड करा आणि पुन्हा अ‍ॅल्युमिनिअमच्या कंटेनरमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. साधारण दहा तासांत आइस्क्रीम व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर थंडगार सर्व्ह करा.

स्ट्रॉबेरी फ्लोट
साहित्य : दीड कप स्ट्रॉॅबेरीचा कुस्करलेला गर, 1 टीस्पून लिंबाचा रस, 1 स्कूप व्हेनिला आइस्क्रीम, 3-4 कप लिंबाच्या फ्लेव्हरचे ड्रिंक.
कृती : सर्व्हिंग ग्लासमध्ये सर्वप्रथम स्ट्रॉबेरीचा गर घाला. त्यावर लिंबाचा रस आणि आइस्क्रीम घाला. नंतर त्यात लिंबाच्या फ्लेव्हरचे ड्रिंक मिसळून, लगेच सर्व्ह करा.

थंडाई कुल्फी
साहित्य : 1 लीटर दूध, दीड कप साखर, पाव कप कॉर्नफ्लोअर, दीड कप फ्रेश क्रीम, थोडं केशर.
थंडाईसाठी : पाव कप बदाम, 2 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून वेलची पूड, 20 पांढरी काळी मिरी.
कृती : थंडाई पूड तयार करण्यासाठी, थंडाईसाठीचं सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून रवाळ वाटून घ्या. पाव कप दुधात कॉर्नफ्लोअर एकजीव करून बाजूला ठेवून द्या. 2 टेबलस्पून कोमट दुधात केशर भिजत ठेवा. आता एका पॅनमध्ये उर्वरित दूध गरम करत ठेवा. उकळी आल्यानंतर त्यात साखर मिसळा. मिश्रण सतत ढवळत पाच मिनिटं शिजवा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालून सतत ढवळत पाच मिनिटं शिजवा. आता त्यात थंडाई पावडर घालून चांगलं एकजीव करा आणि आचेवरून खाली उतरवून थंड करत ठेवा. थंड झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यात फ्रेश क्रीम आणि केशराचं मिश्रण मिसळून एकजीव करा. अ‍ॅल्युमिनिअमच्या आइस्क्रीम कंटेनरमध्ये हे मिश्रण घालून एकसमान करा आणि सहा-सात तास फ्रीजरमध्ये सेमी सेट होण्यासाठी ठेवून द्या. नंतर हे मिश्रण फ्रीजरमधून बाहेर काढून ब्लेंडरने स्मूद होईपर्यंत ब्लेंड करा आणि कुल्फीच्या साच्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. साधारण दहा तासांत कुल्फी व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर थंडगार सर्व्ह करा.