अंडी खावी अशी (Eat Eggs This Way)

अंडी खावी अशी (Eat Eggs This Way)

प्रथिनांनी परिपूर्ण अंड्याचा समावेश आहारात करायचा म्हणजे, एक तर उकडलेलं अंड किंवा ऑम्लेट खायचं असाच अनेकांचा दिनक्रम असतो. मात्र अंड्यापासून अजूनही बरंच काही बनवता येईल.

एग चटणी पकोडा
साहित्य : 4 अंडी (उकडून दोन भाग केलेली), 1 कप बेसन, पाव कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून जिरं, पाव टीस्पून गरम मसाला, चिमूटभर हिंग, 4 टेबलस्पून हिरवी चटणी, तळण्यासाठी तेल.
कृती : बेसनमध्ये पाणी, मीठ, लाल मिरची पूड, जिरं, गरम मसाला आणि हिंग घालून दाट मिश्रण तयार करा. अंड्याच्या एका भागावर हिरवी चटणी लावून त्यावर दुसरा भाग ठेवा. सर्व अंडी अशा प्रकारे तयार करा. आता ही अंडी बेसनाच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

एग चाट
साहित्य : 5 अंडी (कडक उकडून, बारीक तुकडे केलेली), 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, पाव कप उकडलेली कडधान्यं, 2 टेबलस्पून उकडलेला बटाटा, 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 टीस्पून हिरवी चटणी, 1 टीस्पून चिंचेची गोड चटणी, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, चवीनुसार मीठ.
कृती : कोथिंबीर सोडून उर्वरित सर्व साहित्य एकत्र करा. वरून कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा.
टीप : अंडं कडक उकडण्यासाठी, एका भांड्यात 2 इंच पाणी घेऊन अंडी उकडा. पाणी उकळलं की, भांडं आचेवरून खाली ठेवून 12 मिनिटांसाठी भांड्यावर झाकण लावून ठेवा. नंतर अंडी बाहेर काढून बर्फाच्या पाण्यामध्ये थंड करण्यास ठेवा. नंतर अंडं सोलून त्याचे चार तुकडे करा आणि त्यातील पिवळा बलक बाजूला काढून ठेवा.

एग पिझ्झा
साहित्य : 4 अंडी (कडक उकडून चकत्या केलेली), 4 लहान पिझ्झा बेस, काही थेंब ऑलिव्ह तेल, 8 टोमॅटो (चकत्या केलेले), थोडे मोझारेला चीझ किसलेले, थोडे ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ.
कृती : ओव्हनमध्ये पिझ्झा बेस टोस्ट करून घ्या. त्यावर ऑलिव्ह तेल लावा. त्यावर टोमॅटो आणि अंड्याच्या चकत्या पसरवा. त्यावर किसलेलं चीझ पसरवा. वरून ऑरेगॅनो आणि मीठ भुरभुरा. चीज वितळेपर्यंत बेक करा आणि गरमागरम सर्व्ह करा.

मसाला स्क्रॅम्बल एग
साहित्य : 4 अंडी, 2 टेबलस्पून तेल, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1 सिमला मिरची, 4 बटाटे, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, अर्धा कप चीझ किसलेलं.
कृती : कांदे, मिरच्या आणि बटाटे बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, सिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून परता. नंतर बटाटा, काळी मिरी आणि मीठ घालून बटाटा नरम होईपर्यंत शिजवा. त्यात किसलेलं चीझ आणि फेटलेली अंडी घालून चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळा आणि थोडा वेळ शिजू द्या. मसाला स्क्रॅम्बल एग गरमागरम सर्व्ह करा.

एग टोस्ट
साहित्य : 4 अंडी (कडक उकडून चकत्या केलेली), 1 कप वितळवलेलं बटर, 1 टीस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून वूस्टरशायर सॉस, 2 टीस्पून किसलेलं चीझ, 4 ब्रेडच्या स्लाइस रोस्ट केलेल्या, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड.
कृती : बटर, चीझ, लिंबाचा रस, वूस्टरशायर सॉस, मीठ आणि काळी मिरी पूड एकत्र करून बटर सॉस तयार करा. आता रोेस्टेड ब्रेडच्या स्लाइसवर अंड्याचे स्लाइस ठेवून, बंद करा. त्यावर गरम बटर सॉस पसरवून लगेच सर्व्ह करा.