ड्रायफ्रूट आणि फळांची लोणची (Dry Fruit And Frui...

ड्रायफ्रूट आणि फळांची लोणची (Dry Fruit And Fruit Pickle Recipes)

लिंबाचं गोड लोणचं


साहित्य : 5 किलो मोठे लिंबू, 200 ग्रॅम काळी मिरी, 100 ग्रॅम मोठी वेलची, 50 ग्रॅम सुंठ, 25 ग्रॅम जिरं, 10 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम तमालपत्र, 50 ग्रॅम लवंग, 200 ग्रॅम आल्याचे तुकडे, 400 ग्रॅम सैंधव मीठ, 100 ग्रॅम काळे मीठ, साखर चवीनुसार.
कृती ः लिंबं धुऊन, पुसून वाळवून ठेवा. लिंबामध्ये मसाला भरता येईल अशा प्रकारे, त्यांना उभी चिर द्या. आलं बारीक चिरून घ्या. सर्व मसाले रवाळ दळून घ्या. या मसाल्यांमध्ये साखर मिसळा. हा मसाला लिंबामध्ये भरा. हे भरलेले लिंबू स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये ठेवून झाकण घट्ट बंद करा. ही बरणी 10 ते 15 दिवस उन्हात ठेवा. नंतर लोणचं खाण्यास घ्या.

लाल मिरचीचं लोणचं


साहित्य : 1 किलो लाल काश्मिरी मिरची, 1 किलो साखर, 1 टेबलस्पून दालचिनी-लवंग पूड, 1 टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ.
कृती ः काश्मिरी मिरची स्वच्छ धुऊन, तिला चिर देऊन त्यातील बिया काढून घ्या. मिरचीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून, त्यात मीठ व हळद घाला आणि सहा ते सात तास भिजत ठेवा. त्यानंतर मिरचीमधील पाणी निथळून घ्या. आता या मिरचीमध्ये साखर आणि मीठ एकत्र करून बारीक वाटून घ्या. हे वाटण साधारण तीन दिवस कडक उन्हात ठेवा. नंतर त्यात लवंग-दालचिनीची पूड घालून सर्व्ह करा.

चिकूचं लोणचं
साहित्य : 4 चिकू, 1 वाटी लिंबाचा रस, अर्धा वाटी साखर, 1 टेबलस्पून सुंठ पूड, 1 टेबलस्पून लवंग पूड, अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : कढईत लिंबाचा रस, साखर आणि मीठ एकत्र करा, याला चांगली उकळी येऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर यात सुंठ पूड, लवंग पूड, मिरी पूड आणि मिरची पूड घालून चांगलं एकजीव करा. नंतर त्यात चिकूचे काप घालून, मंद आचेवर परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. आठ दिवस ते चांगलं मुरू द्या. त्यानंतर खाण्यास घ्या.

शिंगाड्याचं लोणचं
साहित्य : 1 किलो कच्चे शिंगाडे, अर्धा कप मोहरी पूड, 1 टेबलस्पून हळद,
1 टेबलस्पून हिंग, पाव कप लाल मिरची पूड, 5 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : शिंगाडे सोलून दोन भागात चिरून घ्या. एका पॅनमध्ये हे शिंगाड्याचे तुकडे आवश्यकतेनुसार पाणी घालून नरम होईपर्यंत उकडून घ्या. नंतर त्यातील पाणी निथळून टाका. स्वच्छ सुती कापडावर हे शिंगाड्याचे तुकडे पसरवून वार्‍यावर सुकत ठेवा. आता एका वाडग्यामध्ये सर्व मसाले, 2 टेबलस्पून तेल आणि शिंगाडे एकजीव करून घ्या. हे मिश्रण स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं दोन-तीन दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर त्यावर उर्वरित तेल व्यवस्थित एकत्र करा, नंतर खाण्यास घ्या.

संत्र्याचं लोणचं

साहित्य : 1 किलो संत्री, पाऊण किलो साखर, 2 टेबलस्पून भाजलेलं जिरं,
1 टेबलस्पून काळी मिरी पूड,
1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून हिंग,
2 टीस्पून वेलची पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : संत्री धुऊन स्वच्छ कापडाने पुसून घ्या. नंतर सालासकट या संत्र्याचे दोन भाग करा. मोठ्या वाडग्यात संत्री, साखर आणि मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे मिश्रण आठ-दहा दिवस उन्हात सुकवा. नंतर त्या सर्व मसाले चांगले एकजीव करा आणि हे मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. दोन-तीन दिवस ते चांगलं मुरू द्या. त्यानंतर खाण्यास घ्या.
टीप : या लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्तच घालायला हवं.

ड्रायफू्रट्सचं लोणचं
साहित्य : 2 वाटी चिरलेला गूळ, अर्धा वाटी काजूचे तुकडे, अर्धा वाटी मनुका, अर्धा वाटी खजूर, 1 लिंबू, 2 टेबलस्पून लोणचं मसाला, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार लाल मिरची पूड.
कृती : लिंबू वाफवून त्याच्या फोडी करून घ्या. गुळामध्ये अर्धा वाटी पाणी घालून पाक तयार करा. या पाकात लिंबाच्या फोडी घालून चांगली उकळी आणा. पाक घट्ट झाल्यानंतर यात सुकामेव्याचे तुकडे, लोणचं मसाला, लाल मिरची पूड आणि मीठ घालून दोन मिनिटं उकळू द्या. मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. दोन-तीन दिवस ते चांगलं मुरू द्या. त्यानंतर खाण्यास घ्या.