पनीर मालपोहा, गुजिया (Diwali Special: Paneer Ma...

पनीर मालपोहा, गुजिया (Diwali Special: Paneer Malpoha And Gujiya)

पनीर मालपोहा

साहित्य : 200 ग्रॅम पनीर, 2-3 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे बदाम-पिस्त्याचे काप, 1 वाटी रबडी, 2 चमचे तूप, 1 चमचा साखर, चिमूटभर खाण्याचा सोडा.
कृती : पनीर आणि गव्हाचं पीठ एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात साखर आणि सोडा मिसळून चांगलं मळा. या मिश्रणाचे दोन इंच आकाराचे लहानलहान डोशे तयार करा. पॅनवर थोडं तूप सोडून त्यावर हे डोसे तयार करा. या डोशांवर रबडी, बदाम पिस्ता घालून सर्व्ह करा. हा मालपोहा केशरयुक्त साखरेच्या पाकात बुडवूनही छान लागतो
टीप : नॉन स्टिक पॅन असेल, तर तुपाचा वापर करू नका.

गुजिया

साहित्य : अर्धा किलो मैदा, 100 ग्रॅम बारीक रवा, अर्धा वाटी दूध, 100 ग्रॅम जाड रवा, पाव वाटी तूप, पाव किलो खवा, 4 चमचे नारळाचा कीस, 1 चमचा वेलची पूड, 2 वाट्या पिठीसाखर, साखरेचा पाक.
कृती : मैदा आणि बारीक रवा एकत्र करा. त्यात तुपाचं मोहन घालून, व्यवस्थित चोळून घ्या. त्यात दूध आणि पाणी घालून पीठ भिजवून ठेवा.
आता जाडसर रवा तुपावर भाजून घ्या. आचेवरून उतरवून त्यात किसलेला खवा घाला. नंतर नारळाचा कीस, वेलची पूड आणि आवडीप्रमाणे साखर घालून सारण तयार करून ठेवा. नंतर भिजवलेल्या मैद्याची पुरी लाटून, त्यात सारण भरा आणि करंजीचा आकार द्या. या करंज्या गरम तुपात तळून, नंतर पाकात घाला.
टीप : करंजी पाकातील असल्यामुळे सारणात जास्त प्रमाणात पिठीसाखर घालू नका.

– विष्णू मनोहर