इंस्टंट अनारसे आणि गूळ पापडीचे लाडू (Diwali Spe...

इंस्टंट अनारसे आणि गूळ पापडीचे लाडू (Diwali Special: Anarasa And Laadu Recipe)

इंस्टंट अनारसे


साहित्य : 2 वाटी रवा, 1 वाटी खाण्याचा डिंक, 2 चमचे दही, तळण्यासाठी तूप, आवश्यकतेनुसार एक तारी साखरेचा पाक, आवश्यकतेनुसार खसखस.
कृती : रवा दह्यात अर्धा तास भिजत ठेवा. त्याचा थोडा घट्टसर गोळा तयार व्हायला हवा. नंतर त्यात जाडसर कुटलेला डिंक मिसळून चांगलं मळून घ्या. खसखशीवर अनारसे थापून गरम तुपात तळून घ्या. अनारसा गरम असतानाच साखरेच्या पाकात घोळवून घ्या आणि सर्व्ह करा.
टीप : अनारसे साखरेच्या पाकात घोळवायचे नसतील, तर त्यावर पिठीसाखर भुरभुरा.

गूळ पापडीचे लाडू


साहित्य : 1 वाटी तूप, अर्धा वाटी पोहे, 2 वाट्या कणीक, पाव वाटी भाजलेलं खोबरं, 1 चमचा भाजलेली खसखस, 1 चमचा वेलची पूड, दीड वाटी किसलेला गूळ, 1 वाटी खोबर्‍याचा कीस.
कृती : कढईत तूप गरम करून, त्यात पोहे तळून बाजूला ठेवा. उरलेल्या तुपात कणीक मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजा. तळलेले पोहे, भाजलेलं खोबरं, भाजलेली खसखस आणि वेलची पूड एकत्र करून हाताने कुस्करून मिसळा. नंतर त्यात भाजलेलं कणीक आणि किसलेला गूळ घालून मिश्रण एकजीव करा. या मिश्रणाचे नेहमीप्रमाणे लाडू वळून खोबर्‍याच्या किसात घोळवा आणि सर्व्ह करा.