पोहा वडा आणि कटलेट (Crispy Poha Recipes)

पोहा वडा आणि कटलेट (Crispy Poha Recipes)

पोहा वडा (Poha Vada)

पावसात फक्कड मसालेदार चहासोबत गरमागरम स्वादिष्ट स्नॅक्स खायला मिळाले तर मन खुश होतं. तर मग अगदी फटाफट बनणारे आणि स्वादिष्ट लागणारे पोहा वडे कसे बनवायचे ते पाहूया.

साहित्य :

१  कप जाडे पोहे (भिजवलेले)

पाव कप घट्ट दही, मीठ चवीनुसार

१ कांदा, ३ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर (तिन्ही चिरून घ्या)

अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट

थोडासा कढीपत्ता

२ टेबलस्पून तांदळाचं पीठ, तळण्यासाठी तेल

कृती :

एका बाऊलमध्ये दही, मीठ आणि भिजवलेले पोहे चांगले मिक्स करून १० मिनिटं झाकूण ठेवा.

पोहे नरम झाले की त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून मळून घ्या. आता या मिश्रणात तांदळाचं पीठ घालून पुन्हा मळून घ्या.

मिश्रणाचे मध्यम आकाराचे वडे बनवा.

कढईत तेल गरम करून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्या.

गरमागरम कुरकुरीत पोहा वडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

पोहा कटलेट

पावसाच्या दिवसांत घरात बसल्या बसल्या स्वादिष्ट आणि चटपटीत स्नॅक्सची मजा घ्यायची असेल तर पोहा कटलेट जरूर करून बघा. हे कटलेट खाण्यासाठी जितके स्वादिष्ट तितकेच बनवण्यास सोपे आहे.

फोटो सौजन्य : रुचीस्‌ कीचन

साहित्य :

२ कप भिजवलेले पोहे

२ कप उकडून, स्मॅश केलेले बटाटे

१ बारीक चिरलेला कांदा

प्रत्येकी २-२ टेबलस्पून गाजर (किसलेले) आणि मैदा

अर्धी सिमला मिरची, १ हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर (तिन्ही बारीक चिरुन घेतलेले)

मीठ चवीनुसार

अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर

प्रत्येकी १-१ टीस्पून धणे पूड आणि चाट मसाला

तळण्यासाठी तेल

कृती :

तळण्यासाठीचं तेल वगळता, एका बाऊलमध्ये इतर सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

आता हाताला तेल लावून थोडं मिश्रण घेऊन त्याचे कटलेट बनवा.

कढईत तेल गरम करून त्यात तयार कटलेट सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्या.

तयार गरमागरम पोहा कटलेट हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.