कुरकुरीत पालक भजी आणि चीजी ओनियन रिंग्स (Crispy...

कुरकुरीत पालक भजी आणि चीजी ओनियन रिंग्स (Crispy Palak And Onion Bhajiya)

कुरकुरीत पालक भजी

साहित्य : 8-10 पालकाची पानं, तळण्यासाठी तेल, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड.
घोळ तयार करण्यासाठी : अर्धा कप बेसन, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद पूड, चिमूटभर हिंग, अर्धा कप पाणी, 2 टीस्पून गरम तेल, 2 चिमूट बेकिंग सोडा, स्वादानुसार मीठ.

कृती : पालकाची पानं स्वच्छ धुऊन, निथळून घ्या. घोळ तयार करण्यासाठीचं सर्व साहित्य एका वाडग्यात चांगलं एकजीव करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पातळ मिश्रण तयार करा.
आता कढईत तेल गरम करत ठेवा. पालकाचं प्रत्येक पान बेसनाच्या मिश्रणात घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. पालक गरमागरम कुरकुरीत भजी सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यावर थोडा चाट मसाला आणि मिरची पूड भुरभुरा. गरमागरम भजी टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.

चीजी ओनियन रिंग्स

साहित्य : 2 मोठ्या आकाराचे कांदे, 4 टेबलस्पून बेसन, 2 टेबलस्पून कॉटेज चीज, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून धणे पूड, स्वादानुसार लाल मिरची पूड, पाव टीस्पून आमचूर पूड,
चाट मसाला स्वादानुसार, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : कांद्याच्या गोल चकत्या चिरून घ्या. एका मोठ्या वाडग्यात बेसन, कॉटेज चीज, ओवा, धणे पूड, लाल मिरची पूड आणि आमचूर पूड यांचं एकजीव मिश्रण तयार करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून दाट मिश्रण तयार करा.
आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. कांद्याच्या चकत्यांमधील प्रत्येक कडा वेगवेगळ्या करा. ही कडा एक-एक करून बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम चीजी ओनियन रिंग्स गार्लिक मेयो किंवा टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.