स्वीट कॉर्न सूप आणि कॉर्न-कोरियंडर सूप (Corn So...

स्वीट कॉर्न सूप आणि कॉर्न-कोरियंडर सूप (Corn Soup Recipes)

स्वीट कॉर्न सूप

साहित्य : 1 कप स्वीट कॉर्न (अमेरिकन मक्याचे दाणे), 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 टेबलस्पून लोणी, अर्धा कप बारीक चिरलेला कोबी, 1 गाजर, 1 कांदा, 2 चीज क्युब्स.

कृती : गाजर आणि कांदा बारीक चिरून घ्या. अर्धा कप पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून एकजीव मिश्रण तयार करा.
एका भांड्यात स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लोअर आणि 6 कप पाणी घालून मध्यम आचेवर गरम करत ठेवा. मिश्रणाला उकळी आल्यानंतर, त्यात लोणी घालून 10 मिनिटं शिजवा. नंतर त्यात कांदा, गाजर आणि कोबी घालून, 5 मिनिटं शिजवा. त्यानंतर आच बंद करून, त्यात किसलेलं चीज घाला आणि गरमागरम स्वीट कॉर्न सूप सर्व्ह करा.

कॉर्न-कोरियंडर सूप

साहित्य : अर्धा कप मक्याच्या दाण्यांची जाडसर पेस्ट, अर्धा कप बारीक चिरलेल्या मिश्र भाज्या, अर्धा कप पाणी, अर्धा टीस्पून साखर, 2 टेबलस्पून दूध, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : दुधामध्ये कॉर्नफ्लोअर घालून एकजीव मिश्रण तयार करा. मिश्र भाज्या, मक्याच्या दाण्यांची पेस्ट आणि साखर एकत्र करून त्यात अर्धा कप पाणी मिसळा आणि मिश्रण मध्यम आचेवर गरम करत ठेवा. मिश्रणाला उकळी आली की, त्यात कोथिंबिरीव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घालून, मिश्रण दाट होईपर्यंत उकळवा. मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण दाट झालं की, त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.