चॉकलेट आइस्क्रीम रोल आणि चॉकलेट फ्रोजन योगर्ट (...

चॉकलेट आइस्क्रीम रोल आणि चॉकलेट फ्रोजन योगर्ट (Chocolate Ice Cream Recipes)

चॉकलेट आइस्क्रीम रोल
साहित्य : 2 स्कूप विरघळलेली चॉकलेट आइस्क्रीम (आवडीनुसार), 1 कप चॉकलेट स्पॉन्ज केकचा चुरा.
कृती : 15 बाय 10 इंच आकाराच्या बेकिंग ट्रेमध्ये व्हॅक्स पेपर लावा. बाजूला दोन-दोन इंच सोडून द्या. हा बेकिंग ट्रे चार ते सहा तासांकरिता फ्रीजरमध्ये ठेवा. आता थंड झालेला बेकिंग ट्रे फ्रीजरमधून काढून त्यावर विरघळलेली चॉकलेट आइस्क्रीम आणि केकचा चुरा व्यवस्थित एकजीव करा. दोन-तीन मिनिटं सतत घड्याळाच्या काट्यांप्रमाणे आणि विरुद्ध दिशेने चमचा फिरवून अशा प्रकारे आइस्क्रीम एकजीव करा. आता ट्रेवर आइस्क्रीम आणि केकच्या मिश्रणाचा अगदी पातळ थर पसरवा आणि हा ट्रे पुन्हा चार ते सहा तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.
ट्रेवर आइस्क्रीम व्यवस्थित सेट झाल्यानंतर तो फ्रीजरमधून बाहेर करा. आता अलगद स्पॅटूलाच्या साहाय्याने आइस्क्रीमच्या पातळ थराचे साधारण एक-एक इंचाचे रोल करा. सर्व्हिंग बाऊलमध्ये हे चॉकलेट रोल एकेक करून अलगद व्यवस्थित रचा आणि त्यावर चॉकलेट चिप्स भुरभुरा. त्यावर चॉकलेट सॉसने सजावट करून लगेच थंडगार सर्व्ह करा.

चॉकलेट फ्रोजन योगर्ट
साहित्य : 4 कप पाणी पूर्णतः निथळलेलं दही, 3-4 कप साखर, पाव कप कोको पावडर, चिमूटभर मीठ, 1 कप दूध, अर्धा टीस्पून व्हॅनिला अ‍ॅक्सट्रॅक्ट.
कृती : एका वाडग्यामध्ये दही, साखर, कोको पावडर, मीठ, दूध आणि व्हॅनिला अ‍ॅक्सट्रॅक्ट घालून साखर विरघळेपर्यंत चांगलं फेटा. हे मिश्रण झाकून सात-आठ तास फ्रीजमध्ये ठेवून द्या. सर्व्ह करण्याच्या 15 मिनिटांपूर्वी हे मिश्रण फ्रीजमधून बाहेर काढा आणि थंडगार सर्व्ह करा.