चिकन अँड पोटॅटो फ्राय (Chicken And Potato Fry)

चिकन अँड पोटॅटो फ्राय (Chicken And Potato Fry)

चिकन अँड पोटॅटो फ्राय


साहित्य : मॅरिनेटसाठी : पाव किलो बोनलेस चिकन, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून आमचूर, पाव टीस्पून आलं-लसूण पेस्ट, स्वादानुसार मीठ.
इतर ः 12 लहान बटाटे (बेबी पोटॅटो), अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून आमचूर, पाव टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हिंग, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून मोहरी, 10 कडिपत्त्याची पानं, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.

कृती :
चिकनचे साधारण बटाट्याच्या आकाराचे तुकडे करून, ते स्वच्छ करून घ्या. मॅरिनेटसाठीचे सर्व मसाले चांगले एकजीव करून, ते चिकनच्या फोडींना व्यवस्थित चोळून अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्या. कुकरमध्ये बटाटे व अर्धा कप पाणी घालून दोन-तीन शिट्या करा, म्हणजे बटाटे उकडतील. उकडलेल्या बटाट्यांची सालं काढून घ्या. नंतर प्रत्येक बटाट्यावर काट्याच्या चमच्याने टोचे द्या आणि बाजूला ठेवून द्या. एका कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करून त्यात सर्वप्रथम मॅरिनेट केलेलं चिकन मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर त्याच तेलात बटाटे सोनेरी रंगावर तळा. एका पॅनमध्ये 2 टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी द्या. मोहरी तडतडली की, त्यात कडिपत्ते परतवा. नंतर तळलेलं चिकन आणि बटाटे घालून परतवा. त्यात आलं-लसूण पेस्ट एकत्र करा. नंतर लाल मिरची पूड, आमचूर, हिंग आणि मीठ एकत्र करून 7-8 मिनिटं चांगलं परतवा. त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम चिकन अँड पोटॅटो फ्राय सर्व्ह करा.