चीज कॉर्न पास्ता, ग्रिल्ड कॉर्न टोस्ट, स्वीट कॉ...

चीज कॉर्न पास्ता, ग्रिल्ड कॉर्न टोस्ट, स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स, कॉर्न-पनीर भजी (Cheese Corn Pasta And Other 3 Recipes)

चीज कॉर्न पास्ता

साहित्य : 1 वाटी उकडलेला पास्ता, 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे, 100 ग्रॅम किसलेलं चीज, 1 टेबलस्पून बटर, 1 टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ.

कृती : एका पॅनमध्ये बटर वितळवून, त्यावर पास्ता घालून थोडा वेळ शिजू द्या. त्यानंतर त्यात मक्याचे दाणे आणि इतर साहित्य घालून शिजवा. चीज कॉर्न पास्ता गरमागरम सर्व्ह करा.

 

ग्रिल्ड कॉर्न टोस्ट

साहित्य : 1 कप उकडलेले मक्याचे दाणे, 8 ब्रेड स्लाइस, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 2 कप किसलेलं चीज, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार काळी मिरी पूड व मीठ, 1 टीस्पून बटर, 1 टीस्पून टोमॅटो केचप.

कृती : एका पॅनमध्ये बटर गरम करून, त्यात ब्रेड स्लाइस व्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घाला आणि परतून घ्या. ब्रेड स्लाइस एका बाजूने टोस्ट करून घ्या आणि उलट करून त्यावर मक्याचं तयार केलेलं मिश्रण पसरवा. त्यावर ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवा. गरमागरम ग्रिल्ड कॉर्न टोस्टचे लहान तुकडे करून टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.

 

स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स

साहित्य : एका मक्याच्या कणसाचे किसलेले दाणे, 150 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 4 टेबलस्पून मैदा, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी सिमला मिरची बारीक चिरलेली, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 3 टेबलस्पून घट्ट दही, चिमूटभर खाण्याचा सोडा, चीझचे काही लहान चौकोनी तुकडे, पाव कप ब्रेड क्रम्स, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :
चीज आणि ब्रेड क्रम्स सोडून उर्वरित सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. यातील थोडंसं मिश्रण तळहातावर घेऊन त्यामध्ये एक चीझचा तुकडा घाला आणि त्यास गोल आकार द्या. अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून, ब्रेड क्रम्समध्ये घोळा आणि गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स हिरवी चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करा.

 

कॉर्न-पनीर भजी

साहित्य : 10 बेबीकॉर्न (प्रत्येकाचे आडवे दोन भाग करून), 1 कप बेसन, 1 कप कुस्करलेलं पनीर, चिमूटभर हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून चाट मसाला, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : पनीर, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि चाट मसाला यांचं एकजीव मिश्रण तयार करा. प्रत्येक बेबीकॉर्नचा तुकडा घेऊन, त्यावर हे मिश्रण व्यवस्थित लपेटा. बेसनात सोडा, हळद, लाल मिरची पूड, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून दाट घोळ तयार करा. पनीरचं मिश्रण लावलेला प्रत्येक बेबीकॉर्नचा तुकडा या बेसनाच्या घोळामध्ये घोळून गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम कॉर्न-पनीर भजी टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.