बटर चिकन (Butter Chicken)

बटर चिकन (Butter Chicken)

बटर चिकन

साहित्य : 300 ग्रॅम तंदूरी चिकन (मध्यम आकाराचे तुकडे केलेलं), 1 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून बटर, 2-3 लवंगा, 1 इंच दालचिनीची काडी, 1-2 हिरवी वेलची, 1 जायपत्री, 2 मध्यम आकाराचे कांदे चिरलेले, 3 टोमॅटो चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड, पाव टीस्पून हळद, 8 काजू, 8 बदाम, अर्धा कप फ्रेश क्रीम, 1 टीस्पून साखर, स्वादानुसार मीठ, अर्धा टीस्पून गरम मसाला पूड, पाव टीस्पून कसुरी मेथी, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून बटर मध्यम आचेवर गरम करत ठेवा. त्यात दालचिनी, लवंगा, वेलची आणि जायपत्री परतवा. मसाल्यांचा खमंग सुगंध सुटला की, त्यात कांदे पारदर्शक होईपर्यंत परतवा. नंतर त्यात टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवा. टोमॅटोचा रंग गडद झाला की, त्यात आलं-लसूण पेस्ट घालून 2 मिनिटं परतवा. नंतर त्यात लाल मिरची पूड, धणे पूड, जिरे पूड, हळद, काजू आणि बदाम घालून मिनिटभर परतवा आणि आच बंद करा. मिश्रण थंड झालं की, बारीक वाटून घ्या.
आता त्याच भांड्यामध्ये 1 टेबलस्पून बटर गरम करा आणि त्यात कांदा-टोमॅटोचं वाटण घालून 3-4 मिनिटं मंद आचेवर परतवा. मिश्रणाला तेल सुटू लागलं की, त्यात तंदूरी चिकनचे तुकडे घालून 4-5 मिनिटं परतवा. आवश्यकता असल्यास त्यात गरम पाणी घालून एक उकळी काढा. नंतर त्यात फ्रेश क्रीम, गरम मसाला आणि साखर घालून मिनिटभर शिजवा. शेवटी त्यात कसुरी मेथी एकत्र करा आणि आच बंद करा. गरमागरम बटर चिकन कोथिंबीर घालून सजवा आणि सर्व्ह करा.