शेजवान बेबीकॉर्न आणि बेबीकॉर्न मंच्युरियन (Baby...

शेजवान बेबीकॉर्न आणि बेबीकॉर्न मंच्युरियन (Baby Corn Recipes)

शेजवान बेबीकॉर्न

साहित्य : 400 ग्रॅम दोन भागात चिरलेले बेबीकॉर्न, पाव कप कॉर्नफ्लोअर, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 8 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून अजिनोमोटो (ऐच्छिक), 3 बारीक चिरलेला पातीचा कांदा, 1 कप बारीक चिरलेला पांढरा कांदा, तळण्यासाठी तेल.

मॅरिनेशनसाठी : 1 टेबलस्पून आलं-लसणाची पेस्ट, अर्धा टीस्पून अजिनोमोटो (ऐच्छिक), 2 टीस्पून सोया सॉस, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पूड, 1 टेबलस्पून व्हिनेगर.
सॉससाठी : 3 टेबलस्पून टोमॅटो सॉस, दीड टेबलस्पून सोया सॉस, 2 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 कप पाणी.

कृती : बेबीकॉर्न 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी निथळून टाका. मॅरिनेशनसाठीच्या सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण बेबीकॉर्नच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये सॉससाठीचं सर्व साहित्य घालून व्यवस्थित एकत्र करा आणि मिश्रण दाट होईपर्यंत शिजवा.
कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं पाणी एकत्र करून घोळ बनवा. आता मॅरिनेट केलेले बेबीकॉर्नचे तुकडे या कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणामध्ये घोळून गरम तेलात तळून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि अजिनोमोटो घालून 3 मिनिटं मोठ्या आचेवर परतवा. त्यावर उर्वरित सॉस व तळलेले बेबीकॉर्न घालून शिजवा. पातीचा कांदा घालून सजवून गरमागरम सर्व्ह करा.

 

बेबीकॉर्न मंच्युरियन

साहित्य : 200 ग्रॅम बेबीकॉर्न (लांबट चिरून मीठ घातलेल्या पाण्यात उकडलेले), अर्धा कप कॉर्नफ्लोअर, पाव कप तांदळाचं पीठ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून आलं-लसणाची पेस्ट, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून ऑरिगॅनो, 1 टीस्पून व्हिनेगर, तळण्यासाठी तेल, 1 जुडी पातीचा कांदा बारीक चिरलेला, 1 उभा पातळ चिरलेला कांदा,
2 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, 2 टीस्पून ऑलिव्ह ऑईल, स्वादानुसार मीठ.

कृती : तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल मिरची पूड, आलं-लसूण पेस्ट आणि थोडं मीठ घालून भज्याप्रमाणे मिश्रण तयार करा. या मिश्रणात बेबीकॉर्नचे तुकडे घोळवून, गरम तेलात तळून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करून त्यात कांदा, लसूण आणि पातीचा कांदा परतवून घ्या. नंतर त्या तळलेले बेबीकॉर्न, सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, थोडं मीठ, टोमॅटो केचप आणि ऑरिगॅनो एकत्र करून थोडं परतवा आणि गरमागरम सर्व्ह करा.