छान छान टिफीन रेसिपीज् (5 T...

छान छान टिफीन रेसिपीज् (5 Top Tiffin Recipes)

By Atul Raut in

बदाम लाडू
साहित्य : अर्धा कप जाडसर वाटलेले बदाम, 2 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून खसखस, 2 कप पिठीसाखर, अर्धा कप तूप, अर्धा कप गव्हाचं पीठ, 1 टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पूड.
कृती : कढईत तूप गरम करून त्यात गव्हाचं पीठ आणि रवा 3-4 मिनिटं परतवून घ्या. त्यात बदाम आणि खसखस घालून पुन्हा 2-3 मिनिटं परतून घ्या. खरपूस सुगंध आल्यावर आच बंद करून हे मिश्रण तासभर तसंच ठेवून द्या. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड व जायफळ पूड घालून मिश्रण चांगलं एकत्र करा आणि त्याचे लाडू वळून घ्या.


चुरमा लाडू
साहित्य : सव्वा किलो जाडसर कणीक, सव्वा किलो तूप, सव्वा किलो गूळ, कणीक भिजेल इतकं दूध, तळण्यासाठी तूप.
कृती : सर्वप्रथम कणीक दुधात घट्ट भिजवा. या कणकेचे मुटके तयार करून ते तुपात खमंग तळून घ्या. गूळ बारीक चिरून घ्या. मुटके थंड झाले की, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. मुटक्यांच्या चुर्‍यामध्ये तूप आणि गूळ घालून लाडू वळा.


मेथीचे लाडू
साहित्य : 1 वाटी मेथीचं पीठ, 2 वाटी किसलेलं सुकं खोबरं, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी खसखस, 1 वाटी बारीक वाटलेली खारीक, 1 वाटी बदामाचे बारीक तुकडे, अर्धा वाटी बारीक वाटलेले पिस्ते, स्वादानुसार वेलची, थोडी चारोळी, आवश्यकतेनुसार साजूक तूप, स्वादानुसार दळलेली साखर.
कृती : एका पातेल्यात तूप पातळ करून घ्या. नंतर ते थंड होऊ द्या. या तुपात मेथीचं पीठ भिजत घाला. हे पीठ असंच तीन दिवस भिजत ठेवा. चौथ्या दिवशी सर्वप्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात थोडं तूप घालून, त्यावर खसखस भाजून घ्या. नंतर थंड करून, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. बदामाचे तुकडेही तुपात तळून, थंड करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आता एका जाड बुडाच्या भांड्यात 1 वाटी तूप गरम करून त्यात गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्या. त्यात किसलेलं खोबरं आणि खारीक पूड घालून थोडं परतवा. नंतर आच बंद करून, भांडं आचेवरून खाली उतरवा. त्यात खसखस, बदाम, पिस्ता, खारीक आणि तुपात भिजवलेलं मेथीचं पीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. आता त्यात मिश्रणाच्या निम्म्या प्रमाणात दळलेली साखर घालून एकजीव करा. थोडा वेळ हे मिश्रण असंच झाकून ठेवा. नंतर मध्यम आकाराचे लाडू वळा.
टीप : मेथीचं पीठ भाजू नका. पीठ भाजल्यास कडवटपणा येतो.

खजुराचे लाडू
साहित्य : 1 किलो खजूर, 2 मोठे चमचे कणीक, स्वादानुसार वेलची व जायफळ पूड.
कृती : खजुरामधील बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. कणीक नुसतीच भाजून घ्या. कणीक भाजली की, त्यात वेलची व जायफळ पूड आणि खजुराचे तुकडे घालून व्यवस्थित एकत्र करा. दुधाचा हात लावून हे लाडू वळा.


ड्रायफ्रूट्स लाडू
साहित्य : 500 ग्रॅम बी नसलेले खजूर, 1 कप काजू, 1 कप बदाम, 1 कप पिस्ता, 1 कप अक्रोड, 200 ग्रॅम खारीक.
कृती : बदाम, काजू आणि पिस्ते बारीक करून घ्या. खारकेतील बी काढून, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. अक्रोड रवाळ वाटून घ्या. खजूरही बारीक वाटून घ्या. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून, त्याचे लाडू वळून घ्या.