खाऊचा डब्बा (5 Easy To Make Tiffin Recipes)

खाऊचा डब्बा (5 Easy To Make Tiffin Recipes)

भूक लागली की, त्या क्षणी जे पटकन उपलब्ध होईल ते खाण्यावर आपला भर असतो. मग तो पदार्थ पौष्टिक आहे का, याचा विचारही आपण करत नाही. म्हणूनच ‘खाऊचा डब्बा’ महत्त्वाचा ठरतो. तो पौष्टिक पदार्थांनी भरून ठेवला की, भूक लागल्यानंतर काही तरी अरबट चरबट खाण्याची वेळ येणार नाही.

गूळ पोळी
साहित्य : अर्धा किलो कोल्हापुरी (पिवळा) गूळ, अर्धा वाटी खसखस, अर्धा वाटी तीळ, 1 जायफळ, 1 वाटी तेल, अर्धा वाटी चण्याचं पीठ, 2 वाटी कणीक किंवा मैदा, चवीपुरतं मीठ, तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर, 2 चमचे तेलाचं मोहन.
कृती : गूळ किसणीवर किसून घ्या. तीळ, खसखस भाजून, कुटून घ्या. जायफळ किसून पूड करा. कढईत 1 वाटी तेल गरम करून त्यात चण्याचं पीठ खमंग भाजून घ्या. नंतर त्यात गूळ, तीळ, खसखस, जायफळ घालून व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करा. हे गुळाचं सारण कढईतच थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. गुळाचं सारण तयार केल्यानंतर 4-5 दिवसांनी गूळ पोळी बनवल्यास, अधिक स्वादिष्ट बनते. हे सारण खूप दिवस टिकतं. मैद्यामध्ये मीठ आणि मोहन घालून पाण्याने मैदा भिजवा. आपण नेहमी पोळीकरिता पीठ भिजवतो, त्याप्रमाणेच ही कणीक भिजवा.
भिजवलेल्या मैद्याचे पेढ्याएवढे दोन गोळे करून, पुरीएवढे लाटून घ्या. मैद्याच्या एका गोळ्यापेक्षा थोडं जास्त सारण घेऊन ते दोन पोळ्यांमध्ये पसरवून सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करा. या पुरीला दोन्ही बाजूंनी तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर लावून आतील गूळ पूर्ण कडेपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे पोळी लाटा. गरम तव्यावर ही गूळ पोळी दोन्ही बाजूने छान भाजून घ्या. नंतर ही पोळी कागदावर काढा. गूळ पोळी पूर्णतः थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा.
टीप :
– पोळी तयार करताना, अगदी कडेपर्यंत गूळ न गेल्यास, त्या कडा कापून वेगळ्या केल्या तरी चालेल.
– गूळ पोळी डब्यात भरून ठेवताना, प्रत्येक दोन पोळ्यांमध्ये कागद ठेवा.
– गूळ पोळीला तूप लावून खावं, म्हणजे गूळ बाधत नाही.

मोहन थाळ
साहित्य : 2 वाट्या डाळीचं पीठ, 2 वाट्या तूप, अडीच वाटी साखर, पाऊण वाटी खवा, 1 चमचा वेलची पूड, थोडं केशर, अर्धा वाटी बदाम-पिस्त्याचे काप, अर्धा वाटी दूध.
कृती : दुधामध्ये अर्धा वाटी तूप घालून कडकडीत गरम करा. हे मिश्रण डाळीच्या पिठाला चांगलं चोळून घ्या. हे पीठ 2 तास घट्ट दाबून बांधून ठेवा. नंतर हे पीठ मोकळे करून चाळणीने चाळून घ्या. आता उरलेल्या तुपामध्ये हे डाळीचं पीठ चांगलं भाजून घ्या. खवाही वेगळा चांगला भाजून घ्या. साखरेमध्ये एक वाटी पाणी घालून दोन तारी पाक तयार करा. त्यात वेलची पूड व केशर एकत्र करा. पाक तयार झाल्यावर त्यात चाळलेलं पीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण घट्ट होत आल्यावर तुपाचा हात लावलेल्या थाळीमध्ये ओता आणि सारखं करा. वरून बदाम-पिस्त्याचे काप पसरवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.

गूडपापडी
साहित्य : 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 टीस्पून खसखस, पाऊण वाटी किसलेला गूळ, 5 टेबलस्पून तूप, पाव टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून नारळाचा चव, थोडे बदाम-पिस्त्याचे काप.
कृती : एका मध्यम आकाराच्या थाळीला तुपाचा हात लावून, त्यावर खसखस भुरभुरा आणि बाजूला ठेवून द्या. जाड बुडाच्या भांड्यात तूप वितळवून, त्यात गव्हाचं पीठ मंद आचेवर सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतवा. साधारण 15 मिनिटांत ते होईल. नंतर आचेवरून खाली उतरवून लगेच त्यात गूळ, वेलची पूड आणि नारळाचा चव घालून व्यवस्थित एकत्र करा. गूळ विरघळून मिश्रण एकजीव झालं की, गरम असतानाच खसखस भुरभुरलेल्या ताटात घालून पसरवा. मिश्रण साधारण गरम असतानाच त्याच्या वड्या पाडा. त्यावर बदाम पिस्त्याचे काप घालून सजवा. गूडपापडी हवाबंद डब्यात भरून ठेवा.

तीळ पापडी
साहित्य : 1 कप तीळ, अर्धा कप साखर, पाव टीस्पून जायफळ पूड, स्वादानुसार वेलची पूड, आवश्यकतेनुसार तूप.
कृती : मध्यम आचेवर कढई गरम करत ठेवा. त्यात तीळ कोरडेच भाजून घ्या. सतत ढवळत राहा. सोनेरी रंगाचे झाले की, आच बंद करून वेगळ्या भांड्यात काढून ठेवा. आता अगदी मंद आचेवर पसरट पॅनमध्ये साखर पसरवा आणि न ढवळता तीन-चार मिनिटं तशीच ठेवा. साखर विरघळून सोनेरी रंगाची झाली की, ढवळायला सुरुवात करा. म्हणजे, साखर व्यवस्थित विरघळेल. साधारण दोन मिनिटांत संपूर्ण साखर विरघळली की, त्यात वेलची आणि जायफळ पूड मिसळा. लगेच एकजीव करून आच बंद करा. आता त्यात भाजलेले तीळ घालून त्वरित एकजीव करा. गरम असतानाच चमच्याच्या साहाय्याने त्याचे लहान लहान गोळे करा. आता एका ताटाला भरपूर तूप लावून त्यावर हा गोळा ठेवा आणि अगदी पातळ लाटा. आच बंद केल्यानंतर मिश्रण थंड व्हायच्या आधी हे सर्व पटापट करायला हवं.
टीप : साखरेऐवजी चिक्कीचा गूळ वापरता येईल.

आळिवाचे लाडू
साहित्य : 1 वाटी आळीव, 2 नारळ, अर्धा किलो गूळ, 10 बदामांची जाडसर पूड, 10 काजूंची जाडसर पूड, 2 मोठे चमचे मनुका, स्वादानुसार वेलची पूड.
कृती : नारळ किसून त्याचं एक वाटी दूध काढून घ्या. या नारळाच्या दुधात आळीव दोन तास भिजत ठेवा. नंतर त्यात ओलं खोबरं आणि गूळ एकत्र करून, मंद आचेवर शिजत ठेवा. मिश्रण कडेने सुटू लागलं की, त्यात बदाम-काजू पूड, वेलची पूड एकत्र करा. मिश्रणाचा गोळा झाला की आच बंद करा आणि मिश्रण साधारण थंड होऊ द्या. नंतर मध्यम आकाराचे लाडू वळा.