बर्फी बनवा घरी (10 Dry Fruit And Milk Burfi Rec...

बर्फी बनवा घरी (10 Dry Fruit And Milk Burfi Recipes)

१ मिक्स ड्रायफ्रुट बर्फी

साहित्य: २ वाट्या एकत्रित जाडसर चिरलेला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुका, इत्यादी सुका मेवा, २ वाटया खाँ, अर्धी वाटी दूध, दीड वाटी साखर अर्धा चमचा वेलची पूड, तूप.
कृती: सर्व सुकामेवा एकत्र करावा. पॅनमध्ये तूप तापवावे. त्यावर सोनेरी परतवून घ्यावा. त्यातच साखर घालावी. साखर विरघळल्यावर त्यात खवा घालावा. वरून दूध व वेलचीपूड घालावी. मिश्रण दाट झाल्यावर खाली उतरवावे. डिशला तूप चोळावे . त्यावर बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वडया पाडाव्यात.

२ काजू बर्फी

साहित्य: दीड वाटी जाडसर कुटलेला काजू, २ वाटया कंडेस्ड मिल्क, १ वाटी दुधाची पावडर, १ वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड.
कृती: एका पॅनमध्ये साखर गरम करा. साखर विरघळल्यावर त्यात काजू पूड घाला. हलकेसे परतल्यावर त्यात कंडेस्ड मिल्क घाला. मंद आंचेवर मिश्रण परतवून घ्या. दुधाची पावडर घालून मिश्रण घट्ट करा. वेलची पूड कालवून खाली उतरवा. डिशमध्ये तूप चोळावे . त्यावर बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वडया पाडाव्यात.

3 पनीर बर्फी

साहित्य: अर्धा किलो पनीर, १ वाटी साखर अर्धी वाटी दुधाची पावडर , अर्धा चमचा वेलची पूड.
कृती: पनीर जाडसर किसून घ्यावे. एका पॅनमध्ये साखर तापवावी. त्यात दुधाची पावडर व पनीर घालावे. मिश्रण दाट होईपर्यंत परतत रहावे. दाट झाल्यावर खाली उतरवावे. वेलची पूड घालून कालवावे. ट्रेला तूप लावावे. त्यावर बर्फीचे मिश्रण थापावे. थंड झाल्यावर वडया पडून घ्याव्यात.

4 पनीर खोया बर्फी

साहित्य: २ वाटया किसलेले पनीर , १ वाटी खवा , २ वाटया साखर, अर्धी वाटी बारीक चिरलेला सुका मेवा, २ चमचे दूध मसाला.
कृती: एका पॅनमध्ये­­­ साखर तापवावी. त्यात खवा व पनीर घालावे. मिश्रण एकजीव करावे व मंद आंचेवर परतावे . बर्फीचं मिश्रण दाट होऊ लागल्यावर त्यात दूध मसाला व सुका मेवा घालावा. व्यवस्थित परतवून पॅन खाली उतरवावा. थाळीला बटर चोळावे . त्यावर बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वडया  पाडाव्यात.

5 चीज  बर्फी

साहित्य: २ वाटया किसलेले चीज , १ वाटी खवा, १वाटी साखर, १ वाटी दूध पावडर
कृती: एका पॅनमध्ये साखर तापवावी, त्यावर खवा घालावा. मिश्रण मिळून आल्यावर त्यात दुधाची पावडर घालावी. वरून किसलेले चीज घालून मिश्रण दाट करावे व लगेचच खाली उतरवावे. पेपरवर लोणी लावून त्यावर बर्फी थापावी. थंड झाल्यावर वडया कापाव्यात. चीज बर्फी चवीला छानच लागते.

6 मिल्क बर्फी

साहित्य: ११ लिटर दूध, अर्धी वाटी ब्रेड क्रम्स, २ वाटया साखर , दीड वाटी दूध पावडर, अर्धा चमचा वेलची पूड.
कृती: दूध गरम करावे. मंद आचेवर अर्धा लिटर करावे. त्यातच ब्रेडक्रम्स व साखर घालावी. मिश्रण दात होई पर्यंत हलवावे. वरून दूध पावडर घालावी व पॅन खाली उतरवावा . सातत्याने हलवत मिश्रण थंड व दाट करावे. पेपरला लोणी चोळावे. त्यावर मिश्रण थापावे. थंड झाल्यावर वडया पाडाव्यात.

7 खट्टा बर्फी

साहित्य: २ वाटया ओल्या नारळाचा चव, ३ वाटया घट्ट दही, दीड वाटी साखर , अर्धा चमचा वेलची पूड , अर्धी वाटी दूध पावडर.
कृती: ओल्या नारळाचा चव आणि साखर एकत्र करून मंद आंचेवर शिजण्यास ठेवावे. दही रुमालात घट्ट बांधावे. त्यातील पाणी काढून टाकावे. नारळाचं मिश्रण घट्ट झाल्यावर खाली उतरवावे. त्यात दही, वेलची पूड  व दूध पावडर घालावी. मिश्रण एकजीव कालवावे. डिशला बटर चोळावे. त्यावर मिश्रण थापावे. थंड झाल्यावर बर्फीच्या वडया पडून घ्याव्यात.

8 मावा बर्फी

साहित्य: २ वाटया घट्ट आटवलेले दूध, २ वाटया दूध पावडर, अर्धी वाटी खवा , २ वाटया साखर, पाव वाटी सुका मेवा काप.
कृती: एका पॅनमध्ये साखर तापवावी. त्यावर दूध पावडर घालून मिश्रण हलकेसे परतावे. खावा व मेवा घालून मिश्रण सतत परतावे. वरून आटवलेले दूध घालून बर्फीचे मिश्रण दाट होईपर्यंत परतत रहावे. नंतर खाली उतरवावे. डिशला तुपाचा हात चोळावा . त्यावर मिश्रण थापून घ्यावे. थंड झाल्यावर वडया पाडाव्यात.

9 मिल्क मेड बर्फी

साहित्य: २ वाटया कंडेन्स्ड मिल्क , अर्धी वाटी साय, १वाटी खवा दीड वाटी साखर, अर्धी वाटी काजूचे पातळ काप.
कृती: कंडेन्स्ड मिल्क, साय एकत्र घोटावे. खवा , साखर एकत्र कालवावे. पॅनमध्ये मंद  आंचेवर खवा गरम करावा. पातळ झाल्यावर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालावे. काजू घालून  मिश्रण दाट होईपर्यंत परतवावे. नंतर खाली उतरावे. डिशला तुपाचा हात चोळावा. त्यावर बर्फीचं मिश्रण थापावं . थंड झाल्यावर वडया पाडाव्यात.

10 इंस्टंट बर्फी

साहित्य: २ वाटया दूध पावडर, १ वाटी साखर, अर्धी वाटी सुकामेवा काप.
कृती: एका पॅनमध्ये साखर गरम करावी. त्यात दुधाची पावडर घालावी. घट्टसर परतवून खाली उतरावे. वरून सुकामेवा घालावा. डिशला तुपाचा हात लावावा व बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वडया  पाडाव्यात.