स्नॅक्स रेसिपीज

स्नॅक्स रेसिपीज

सध्या कुटुंबातील बऱ्यापैकी सर्व सदस्य घरातच असल्यामुळे शिवाय बाहेरचे खाणे बंद असल्यामुळे जेवणाचं ठीक पण नाश्तसाठी रोज काय करावे असा प्रश्न प्रत्येकीला पडतो. त्यानुसार स्वंयपाकघरात निरनिराळे प्रयोग सुरू होतात. त्यातून एखादा पदार्थ नवा चेहरा, नवा स्वाद घेऊन येतो. असेच काही नावीन्यपूर्ण स्नॅक्स …

इंस्टंट ओट्स मसाला डोसा

साहित्यःडोसा बनविण्यासाठीः१ कप ओट्स (जरा जाडसर वाटून घ्या), प्रत्येकी २-२ टेबलस्पून सुजीचा रवा आणि तांदळाचं पीठ, अर्धा कप ताक, ४ टीस्पून तेल, १ पॅकेट फ्रूट सॉल्ट, चवीनुसार मीठ.

स्टफिंगसाठीः५ बटाटे (उकडून स्मॅश करून घ्या), २ टेबलस्पून मटार, थोडी कोथिंबीर चिरलेली, ४हिरव्या मिरच्या चिरून, चवीनुसार मीठ, १ टीस्पून आल्याची पेस्ट, पाव टीस्पून राई, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धणे पूड आणि पाव चमचा लाल मिरची पावडर, कढिपत्तची पानं.

कृतीः स्टफिंगसाठीः एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात राई आणि कढिपत्त्याची फोडणी द्या.त्यात आल्याची पेस्ट घालून परतून घ्या.नंतर हळद, धणे पूड आणि मटार घालून मटार मऊ होईर्पंत शिजवा. उरलेलं सर्व साहित्यत्यात घालून २मिनिटं मिश्रण परता आणि आचेवरून खाली घ्या.

डोसा बनवितानाः ओट्स, सुजी आणि तांदळाचे पीठ एकत्र करून ताका मध्ये ३० मिनिटांकरिता भिजवून ठेवा. त्यात मीठ आणि फ्रुट सॉल्ट घालून फेटून घ्या. नंतर नॉनस्टिक पॅनवर १ टेबलस्पून डोशाचं पीठ पसरवून घ्या.त्यावर स्टफिंग ठेवून मंद आचेवर डोसा क्रिस्पी होईस्तोवर शिजवा. तयार मसाला डोसा, सांबर आणि खोबऱ्याची चटणीसोबत सर्व्ह करा.

मैसूर मसाला बोंडा

साहित्यः १ कप मैदा, पाव कप तांदळाचं पीठ, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा कप दही, गरजेनुसार पाणी, १ टीस्पून आलं बारीक केलेलं, १ कांदा, ३-४ हिरव्यामिरच्या आणि २ टेबलस्पून कोथिंबीर (ह्या तीन गोष्टी बारीक चिरून घ्या.), तळण्यासाठी तेल.

कृतीः एका बाऊल मध्ये मैदा, तांदळाचं पीठ, दही, बेकिंग सोडा, मीठ, हिरवी मिरची, आलं, कांदा आणि जिरं एकत्र करून त्याचं घट्टसर मिश्रण बनवून घ्या.गरजेनुसार पाणी त्यात घालून मिश्रण चांगलं फेटा. नंतर बाऊलवर झाकण घालून २०मिनिटं तसंच ठेवा. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मध्यम आकाराचे बोन्डे (वडे) बनवून घाला. ते सोनेरी रंगाचे होईस्तोवर तळून घ्या. तयार बोन्डे खोबऱ्याच्या चटणीसोबत खा.

चीज उत्तपम

साहित्यः ३ कप तांदूळ, प्रत्येकी १-१ कप उडदाची डाळ आणि उकडीचे तांदूळ, अर्धा कप दही, चवीनुसार मीठ, १ कांदा, १ सिमला मिरची, १ गाजर (तिन्ही बारीक चिरून घ्या) ,१ टीस्पून ऑरिगॅनो, १ टीस्पून चिली फ्लेक्स, पाव कप मक्याचे दाणे, चवीनुसार पिझ्झा स्प्रेड, ४-५ चीज क्यूब्स,  तेल.

कृतीः तांदूळ आणि डाळ ७-८ तासांकरिता भिजवून ठेवा.नंतर त्याधील पाणी काढून मिक्सर मधून वेगवेगळे वाटून घ्या. नंतर दोन्ही तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं वाटण एकत्र करा. या बॅटरमध्ये दही घालून व्यवस्थित फेटा. आता हे बॅटर ६-७ तासांकरिता झाकून ठेवा. नंतर या पेस्टमध्ये सर्व चिरलेल्या भाज्या घाला. मीठ घाला. नंतर नॉनस्टिक तव्यावर तेल लावून १ टेबलस्पून बॅटर त्यावर पसरवा. मंद आचेवर ते चांगले शेकून घ्या. त्यावर पिझ्झा स्प्रेड पसरवा आणि वरून चीज किसून घाला. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स वरून भुरभुरा. चीज वितळले की गरमागरम चीज उत्तपम सर्व्ह करा.

सँडविच उत्तपा

साहित्यः२ कप सूजी, १ कप दही, अर्धा कप पाणी, १ कांदा, १ टोमॅटो, १ गाजर आणि १सिमला मिरची, २हिरव्या मिरच्या (सर्व बारीक चिरून घ्या.), मीठ चवीनुसार, पाव कप तूप.

सँडविच बनविणसाठीः १ कांदा आणि १ टोमॅटो (गोलाकार चिरून घ्या), प्रत्येकी पाव कप शेजवान सॉस, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस.

कृतीः एका बाऊलमध्ये दही, सुजी, मीठ, हिरवी मिरची आणि पाणी एकत्र करून तयार बॅटर १०मिनिटं बाजूला ठेवा. आता नॉनस्टिक तव्यावर तूप लावून पसरवा. त्यावर १ टेबलस्पून बॅटर घालून पसरवा. चिरलेला वर चिरलेला कांदा, गाजर, सिमला मिरची आणि टोमॅटो घालून हलकेच दाब द्या. उत्तपा दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्या. अजून दोन उत्तपे अशाच पद्धतीने बनवून घ्या.

सँडविच बनविण्यासाठीः एका उत्तप्यावर शेजवान सॉस, दुसऱ्यावर हिरवी चटणी आणि तिसऱ्यावर टोमॅटो सॉस लावा. नंतर पहिल्या आणि दुसऱ्या उत्तप्यांवर गोल कापलेले कांदा आणि टोमॅटो ठेवा.शेवटी तिसरा उत्तपा ठेवून तयार सँडविच सर्व्ह करा.

मुगाचा ढोकळा

साहित्यः१ कप अख्खे हिरवे मूग, १ टेबलस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, अर्धा कप पाणी वाटणाकरिता, १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून बेकिंग सोडा किंवा इनो.

फोडणीसाठीः १ ते २ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं, १ टीस्पून पांढरे तीळ भाजून घेतलेले, चिमूटभर हिंग, कढिपत्ता, २ टेबलस्पून पाणी.

सजावटीसाठीः पाव कप कोथिंबीर चिरलेली, पाव कप खोवलेले खोबरं.

कृतीः बॅटर बनवणसाठीः अख्खे हिरवे मूग स्वच्छ धुऊन पुरेसे पाणी घेऊन ६ ते ७ तास किंवा रात्रभर चांगले भिजवून ठेवा.सकाळी मुगातील पाणी काढून टाका.आता मिक्सरच्या भांड्यात ते मूग, कोथिंबीर आणि अर्धा कप पाणी घालून अर्धवट भरडल्यासारखं वाटून घ्या. एकदम बारीक वाटू नका. मिश्रण जास्त जाड वा अगदीच पातळही ठेवू नका. ढोकळ्यासाठी लागतं तसं मध्यम बॅटर बनवायचं.

ढोकळा बनविण्यासाठीः मिक्सर लावण्याच्या दरम्यान एका पातेल्यात २ ते अडीच कप पाणी गरम करत ठेवा. हे पाणी चांगले उकळू द्या. एका पसरट गोल पॅनला तेल लावून घ्या. आता मुगाच्या बॅटर मध्ये हिरवी मिरची आणि यांची पेस्ट, तेल, लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगले ढवळा. सगळ्यात शेवटी सोडा किंवा इनो घाला आणि एकत्र करून लगेचच हे बॅटर तेल लावलेल्या पॅनमध्ये ओता. नीट पसरवा. नंतर पाणी गरम केलेल्यापातेल्यावर पॅन ठेवा. पॅनवर घट्ट झाकण ठेवा आणि १२-१५मिनिटं ढोकळा शिजू द्या. ढोकळा शिजला की पॅन खाली घ्या आणि गॅस बंद करा.

फोडणीसाठीः एका लहान पॅनमध्ये तेल गरम होऊ द्या. त्यात राई घाला. ती तडतडली की त्यात जिरं घाला. ते तपकिरी झालं की त्यात हिंग, कढिपत्ता आणि परतून घेतलेले तीळ घाला. सर्व साहित्य चांगले परतून घ्या नि त्यात २ टेबलस्पून पाणी घाला. ढवळा आणि उकळी येऊ द्या. पाणी घालताना सावकाश घाला. आता ही फोडणी तयार ढोकळ्यावर वरून घाला. तयार ढोकळा खोबरं आणि कोथिंबीरने सजवा. गरमगरम ढोकळा पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा.

फ्लॉवर मंच्युरिअन

साहित्यःफ्लॉवरचे तुरे तळण्यासाठीः १ मध्यम आकाराचा फ्लॉवर, १ कप मैदा, ४ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, पाव टीस्पून काळी मिरी पूड, पाव टीस्पून ते अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरचीपावडर, १ टीस्पून सोया सॉस, १ कप पाणी (गरजेनुसार कमी जास्त करा.), ५-६ टेबलस्पून तेल तळण्यासाठी.

इतर साहित्यः पाऊण कप चिरलेली कांद्याची पात (पांढरा कांदा वापराचा आणि हिरवी पात चिरून सजावटीसाठी वेगळी ठेवा.), अर्धा कप चिरलेली सिमला मिरची, ३ टीस्पून आलं बारीक केलेलं, ८ ते १० लसूणपाकळ्या बारीक चिरलेल्या, २ हिरव्यामिरच्या बारीक चिरून, अर्धा टेबलस्पून सेलेरी चिरलेली ( हवी असेल तर वापरा), दीड टेबलस्पून लाइट सोया सॉस (चवीनुसार वापरा), १ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ टेबलस्पून व्हिनेगर (जे उपलब्ध असेल ते वापरा), पाव ते अर्धा चमचा काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ.

कृतीः सर्वप्रथम फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे कापून घ्या. एका भांड्यामध्ये पाणी गरम करा.त्यात मीठ घाला. आता त्यापाण्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून एक उकळी काढून घ्या. फ्लॉवरचे तुरे मऊ झाले की त्यातील पाणी काढून टाकून ते एका बाजूला ठेवा. आता एका भांड्यामध्ये बॅटरसाठी लागणारं मैदा, कॉर्नफ्लोअर, सोया सॉस, काळीमिरी पूड, काश्मिरी लाल मिरची पावडर आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडं पाणी घालून व्यवस्थित मिसळा. त्यात पीठाची गुठळी राहता कामानये. नंतर या बॅटरमध्ये फ्लॉवरचे तुरे बुडवून गरम तेलामध्ये डीप फ्राय करा किंवा पॅनमध्ये शॅलो फ्राय करा. परंतु फ्लॉवर सर्व बाजूंनी शेकले जाऊन सोनेरी रंगाचे झाले पाहिजेत. सर्व फ्लॉवर तळून झालनंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवा.

ड्राय मंच्युरियन बनविण्यासाठी शॅलो फ्रायसाठी घेतलेल्या पॅनमध्येच तेल न घालता आलं, लसूण आणि हिरव्यामिरच्या घाला. नंतर त्यात चिरलेला पातीचा कांदा आणि सिमला मिरची घाला. सेलेरी घेतली असल्यास ती घाला. गॅस थोडा वाढवा आणि सर्व मिश्रण ढवळत राहा. सिमला मिरची अर्धवट शिजू द्या किंवा पूर्ण शिजवून घ्या. नंतर त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप, काळी मिरीपूड आणि मीठ घाला. व्यवस्थित ढवळा. त्यात तळलेले फ्लॉवरचे तुरे घाला. तयार मसाला फ्लॉवरच्या प्रत्येक तुऱ्यांना व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिश्रण चांगले ढवळा. शेवटी व्हिनेगर घाला आणि ढवळा.नंतर गॅस बंद करा. चव पाहा. हवं असल्यास आपल्या आवडीनुसार सोया सॉस, टोमॅटो केचप घाला आणि गरमगरम खा.

मिक्स डाळ वडा

साहित्यः१ कप चणा डाळ (भिजवलेली), अर्धा कप चिरलेला कांदा, प्रत्येकी अर्धा-अर्धा टीस्पून हिंग आणि आल्याची पेस्ट, २ टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, थोडी चिरलेली कोथिंबीर, थोडा कढिपत्ता, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृतीः डाळीचं पाणी निथळून ती मिक्सरमधून पाणी न घालता थोडी जाडसर वाटून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य डाळीच्या वाटणात एकत्र करून त्याचे मध्यम आकाराचे वडे बनवा. कढईत तेल गरम करत ठेवा. मंद आचेवर गरम तेलामधून हे वडे सोनेरी रंग येई पर्यंत तळा. तयार वडे खोबरच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

लेमन शेवया

साहित्यः २ कप गव्हाच्याशेवया, २कांदे, २ हिरव्या मिरच्या आणि आल्याचा एक तुकडा (बारीक कापून घ्या), थोडा कढिपत्ता, १ टीस्पून राई, अर्धा टीस्पून हळद, अर्धा कप शेंगदाणे (तळून घ्या), २ टेबलस्पून लिंबाचा रस, २ टेबलस्पून तेल, थोडी चिरलेली कोथिंबीर

कृतीः एका पॅनमध्ये गरजेप्रमाणे पाणी घेऊन त्यात २ टीस्पून तेल, हळद आणि मीठ घालून गरम करा. पाण्याला उकळी आली की त्यात शेवया घाला.शेवया मऊ झाल्या की आचेवरून खाली उतरून त्यातील पाणी काढून टाका. आता पॅनमध्ये तेल गरम करून राई आणि कढिपत्तची फोडणी द्या. त्यात कांदा आणि आलं घालून व्यवस्थित परतून घ्या. शेवटी त्यात शिजवून घेतलेल्या शेवया आणि लिंबाचा रस घालून चांगलं मिक्स करून घ्या. नंतर त्यात तळलेले शेंगदाणे घाला. १-२मिनिटं शिजवा आणि गरमगरम सर्व्ह करा.

तांदळाच्या कुरकुरीत पुऱ्या

साहित्यः १ कप तांदळाचं पीठ, २-३ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून कसुरी मेथी, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृतीः सर्वप्रथम तांदळाचं पीठ मळून घ्यायचं. त्यासाठी एका भांड्या मध्ये १ कप पाणी गरम करत ठेवा. त्यात जिरं, १ टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ घालून भांड्यावर झाकण ठेवून ते उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि १ कप तांदळाचं पीठ त्यात घाला. ते पीठ पाण्यात चांगलं ढवळा आणि झाकण लावून ५मिनिटं ठेवा. पाच मिनिटांनंतर पीठ थोडंसं फुगलेलं दिसेल. आता त्यात कसुरी मेथी, लाल मिरची पावडर आणि तेल घालून चांगलं मळून घ्या. नंतर तयार पीठाचे पुरीसाठी गोळे बनवा.पुरी लाटून घ्या आणि कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर पुरी तळून घ्या. तांदळाचं पीठ लवकर सुकतं तेव्हा पीठ गरम असतानाच पुऱ्या लाटा. तयार पुऱ्या गरमगरमच खा. चहासोबत वा टोमॅटो सॉससोबतही खाता येतात.

कुरकुरीत पोहे कटलेट

साहित्यः  तीन उकडलेले बटाटे, दोन वाट्या भिजवलेले पोहे, एक कांदा बारीक चिरलेला, एक टीस्पून चाट मसाला, १ चमचा हळद, दीड चमचा लाल मिरची पावडर, आलं-लसूण पेस्ट, अर्धे लिंबू, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार.

कव्हरसाठी : एक वाटी तांदूळ पीठ, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, ब्रेडक्रम्स.

कृतीः  एका भांड्यात उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्या. त्यात भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा, एक टीस्पून चाट मसाला, एक चमचा हळद, दीड चमचा लाल मिरची पावडर, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार घालून एकत्र करा. तांदूळ पीठ, कॉर्नफ्लोअर आणि मीठ एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या.वरील मिश्रणाचे चपट्या आकाराचे गोळे करून तांदूळ आणि कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून नंतर ते ब्रेडक्रम्स मध्ये घोळवा. नंतर तेलात तळून घ्या. सॉस किंवा पुदिना चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करा.

ओनियन पनीर पराठा

साहित्यः १ कप पनीर, २ कांदे, १ टीस्पून ओवा, ४ हिरव्यामिरच्या, १ टीस्पून लाल मिरची पावडर, २ कप कणीक मळून घ्या, तूप आणि मीठ आवश्कतेनुसार.

कृतीः आधी पनीर किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओवा, लाल मिरची पावडर एकत्र मिसळा. आता कणकेचा एक गोळा घ्या.  त्यात पनीर व कांद्याचे मिश्रण घालून गोळा बंद करा. हा गोळा पोळी प्रमाणे लाटून घ्या. पॅनवर तूप घालून दोन्ही बाजूने पराठा खरपूस शेकून घ्या. गरमगरम पराठा सॉस सोबत सर्व्ह करा.

नवरात्रीचा सण म्हणजे नऊ दिवस देवीच्या जागराचा सण.नऊ दिवस उपवास करण्याचा दिवस. अलीकडे तरुण मंडळी देखील उपवास करू लागलीत, तेवढंच वजन कमी झालं तर झालं… परंतु शरीराची हालचाल न करता उपवासाच्या नावाखाली चुकीचे पदार्थ खाणं वा अगदीच काहीही न खाणं ह्या दोन्ही गोष्टी आरोगच्या व वजनाच्या दृष्टीनेही हानिकारकच आहेत. त्यापेक्षा दिवसभर थोडं थोडं खाल्लं पाहिजे अन् शरीराला व्यायामही दिला पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात. तेव्हा नव्याने उपवास करणाऱ्या मंडळीं साठी काही नव्या रेसिपी…

मखान्याची खीर

साहित्यः १ लीटर दूध, पाव कप मखाना, २ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून पिस्ता बारीक करून, २ टीस्पून बदाम बारीक करून, १ टीस्पून वेलची पूड.

कृतीः एका पसरट भांड्यामध्ये दूध गरम करत ठेवा. आता मखाने बारीक कापून ते दुधामध्ये घाला. ते दूध १-२ तास मंद आचेवर उकळू द्या. दूध आटून घट्ट आणि अर्धे झाल्यावर त्यात साखर घाला. आता गॅस बंद करा. खीर थंड होऊ द्या. मग सर्व्ह करा.

शिंगाड्याचा समोसा

साहित्यः १२०ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, पाव कप आरारुट पावडर, ६० ग्रॅम तूप, अडीच कप पाणी, १ टीस्पून सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप.

सारणासाठीः १२५ ग्रॅम चारोळी (२ तास पाण्यात भिजवून ठेवा), पाऊण टीस्पून लाल मिरची पावडर, १ टेबलस्पून जिरं, २ टीस्पून धनेपूड, २ टीस्पून सैंधव मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, ३० ग्रॅम तूप.

कृतीः भिजवलेल्या चारोळीची सालं काढून ती मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून ते गरम होऊ द्या. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की त्यात चारोळीची पेस्ट आणि उरलेले सर्व साहित्य घाला. मंद आचेवर ठेवून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होऊ द्या. नंतर खाली उतरवून थंड करा.

समोसा कव्हर बनविण्यासाठीः एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात तूप आणि १ टीस्पून मीठ घाला आणि उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्यात शिंगाड्याचं पीठ आणि आरारुट पावडर घाला आणि नीट एकत्र करा. मंद आचेवर ठेवून ते पीठ चांगले एकजीव होऊ द्या. नंतर गॅस बंद करा आणि पीठ चांगलं मळून घ्या. पीठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. गोळ्याची पुरी लाटा व तिचे दोन समान भाग कापा. एका भागाच्या सपाट बाजूला पाण्याचं बोट लावा आणि दोन्ही कडा एकत्र जुळवून त्याचा कोन बनवा. कोन मध्ये तयार सारण भरून कोन बंद करा. सर्व गोळ्यांचे असे समोसे बनवून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम होऊ द्या आणि त्यात समोसे सोनेरी रंग येईस्तोवर तळा. गरमगरम समोसा सर्व्ह करा.

केळ्याचे कबाब

साहित्यः२५० ग्रॅम कच्ची केळी (सोलून चौकोनी आकारात कापून घ्या), १ मोठी वेलची, पाव कप शिंगाड्याचं पीठ, २ टीस्पून सैंधव मीठ, २ टीस्पून धनेपूड (भाजलेले धणे), अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, २ टीस्पून लिंबाचा रस, १ हिरवी मिरची चिरून, २ टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली, तळण्यासाठी तेल किंवा तूप.

कृतीः कच्ची केळी सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. नंतर हे केळ्याचे तुकडे, आलं आणि वेलची पाणी गरम करून त्यात वाफवून घ्या. नंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर केळी स्मॅश करून घ्या. त्यात शिंगाड्याचं पीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून एकत्र करा. शेवटी हिरवी मिरची घाला. आता या सर्व मिश्रणाचा कणकेसारखा गोळा बनवा. त्याचे मध्यम आकाराचे गोल बनवून त्यास कबाबसारखा आकार द्या. नंतर मंद आचेवर पॅनमध्ये हे कबाब दोन्ही बाजूने तुपामध्ये खरपूस शेकून घ्या. एका टिश्यू पेपरवर ते काढा आणि गरमगरम सर्व्ह करा.

उपवासाचे पनीर रोल

साहित्यः २ बटाटे उकडलेले, २ कप पनीर स्मॅश करून, १ हिरवी मिरची, अर्धा टीस्पून आलं, १ टीस्पून जिरे पूड, १ टीस्पून सैंधव मीठ, ७-८मनुका, १ टीस्पून काळी मिरीपूड, १ टीस्पून वेलची पूड, चिमूटभर सुका मेवा, २ टीस्पून कोथिंबीर, २ टीस्पून तूप.

कृतीः उकडलेले बटाटे आणि स्मॅश केलेलं पनीर एका बाऊल मध्ये एकत्र करा.त्यात चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची घाला. ते एकत्र मिसळून घ्या. नंतर त्यात जिरे पूड, सैंधव, मनुका, मिरीपूड, वेलची पूड, सुका मेवा आणि चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व एकत्र मळून त्याचा पीठासारखा घट्ट गोळा बनवा. आता त्यामिश्रणाचे लांबट आकाराचे रोल बनवा. एका पॅनमध्ये तूप लावून हे रोल त्यावर शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग झाला की तयार पनीर रोल सर्व्ह करा.

साबुदाणा भेळ

साहित्यः अर्धा कप साबुदाणा, १ बटाटा (तुकड्यांत कापलेला), चिमूटभर लाल मिरची पावडर, १ टेबलस्पून शेंगदाणे, १ टेबलस्पून काजू, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार सैंधव मीठ.

सजावटीसाठीः चिरलेली कोथिंबीर.

कृतीः साबुदाणा व्वस्थित धुऊन घ्या नि त्यात पाणी घालून २ ते २ तास भिजवून ठेवा. मंद आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाले की त्यात बटाट्याचे तुकडे तळून घ्या. ते तपकिरी रंगाचे झाले की एका ताटामध्ये काढून घ्या. नंतर त्याच पॅनमध्ये शेंगदाणे आणि काजूही तळून घ्या नि भांड्यात काढून ठेवा. आता पुन्हा पॅनमध्ये थोडं तेल घाला. तेल गरम झालं की त्यात साबुदाणा घाला. हा साबुदाणा मऊ झाला की त्यात तळलेले बटाट्याचे तुकडे, शेंगदाणे, काजू, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून १ मिनिट शिजवा. नंतरआच बंद करा. शेवटी साबुदाण्यामध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार साबुदाणा भेळ कोथिंबीरने सजवा. आणि मग सर्व्ह करा.