अखंड बडबड करणारी गौरी कुलकर्णी झाली अबोली (Real...

अखंड बडबड करणारी गौरी कुलकर्णी झाली अबोली (Real Life Chatterbox Gauri Kulkarni To Play Reticent Role In New Serial)

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतेय नवी मालिका अबोली. मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून गौरी ही भूमिका साकारण्यासाठी खुपच उत्सुक आहे.

या भूमिकेविषयी सांगताना गौरी म्हणाली, ‘अबोली मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच स्टार प्रवासोबत काम करतेय याचा आनंद आहे. अबोली ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचं असं वेगळं जग आहे ज्यात ती रमते. खरतर तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही. माझ्यासाठी ही अतिशय आव्हानात्मक भूमिका आहे. कारण मला बोलायला खूप आवडतं. सेटवर माझी अखंड बडबड सुरु असते. अबोली मात्र मितभाषी आहे. त्यामुळे अबोली साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. आमची टीम खूपच छान आहे. सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ या ऐतिहासिक मालिकेचा आज शेवटचा भाग प्रक्षेपित होणार असून त्या जागेवर उद्यापासून ‘अबोली’ दिसणार आहे.