रविना टंडनने केले आपल्या पिताजींवर अंत्यसंस्कार...

रविना टंडनने केले आपल्या पिताजींवर अंत्यसंस्कार (Ravina Tandon Performs Father Ravi Tandon’s Last Rites)

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. काल शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रवी टंडन हे मागील काही काळापासून फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने त्रस्त होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराचे सर्व विधी रविना टंडनने पूर्ण केले आहेत.

रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली. त्यानंतर रवीनाने तिच्या वडिलांसोबत फोटो शेअर करत “तुम्ही नेहमी माझ्याबरोबर चालत रहाल, मी नेहमीच तुमची असेन, मी कधीही तुम्हाला जाऊ देणार नाही. लव्ह यू पापा,” अशी भावुक कॅप्शन दिली आहे.

रवी टंडन यांनी ७० आणि ८० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘खेल खेल में’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’, ‘चोर हो तो ऐसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिग्दर्शन कारकीर्दीची सुरूवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. १९६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते.

या दुःखाच्या प्रसंगी रविना टंडनने शोक संदेश पाठवणाऱ्या तसेच सांत्वन करणाऱ्या सर्व सहकलाकारांसह चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम