रणवीर सिंहने हिंदी नव्हे तर मराठी बिग बॉसमधल्या...

रणवीर सिंहने हिंदी नव्हे तर मराठी बिग बॉसमधल्या आपल्या मैत्रिणीला दिला पाठिंबा (Ranveer Singh Surprisingly Supports Marathi Artist Of Big Boss Rather Than Hindi Artist)

हिंदी आणि मराठी बिग बॉस सुरु झाल्यापासून या शोबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असते. या शोमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा चाहता वर्ग आपापल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असतात. आता यामध्ये सेलिब्रेटींनीही उडी घेतली आहे. मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे अनेक सेलिब्रेटीही आपल्या आवडत्या स्पर्धक मित्र मैत्रिणीला व्होट करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपील करत आहेत.

आता यावेळी चक्क बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहनेसुद्धा बिग बॉसमधल्या त्याच्या मैत्रिणीला पाठिंबा देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. रणवीर सिंग म्हटल्यावर सगळ्यांना बिग बॉस हिंदीमधील कोणीतरी स्पर्धक असेल असे वाटेल. पण रणवीरने मराठी बिग बॉसमधील आपल्या मैत्रिणीला पाठिंबा दिला आहे. आणि ती स्पर्धक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने तेजस्विनी लोणारीसाठी खास शुभेच्छा देणारा व्हिडीओ तयार केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तेजस्विनीने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणाला, “तेजू तू ५० दिवस पूर्ण केले आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा. महेश सरांनाही माझा नमस्कार. मला तुझी आठवण येते. तू जिंकून ये, आपण जंगी सेलिब्रेशन करुया. त्याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.”

“एका उत्साही व्यक्तीकडून दुसऱ्या उत्साही व्यक्तीला शुभेच्छा. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून  फॅशन, अभिनय आणि इतर सर्व गोष्टींमुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंह आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या #TerrificTejaswini ने बिग बॉस मराठीच्या घरात ५० दिवस यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल तिचे अभिनंदन. तसेच तिच्या उर्वरित प्रवासासाठी तिला खूप प्रेम. ती यशस्वी व्हावी यासाठी शुभेच्छा”, असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

बिग बॉसमध्ये तेजस्विनीने आपल्या शांत, आणि खेळाडू स्वभावाने सर्वांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांचाही तिला भरपूर पाठिंबा मिळत आहे.