राणी कित्तूर चेन्नम्मा : भारताची शूर स्वातंत्र्...

राणी कित्तूर चेन्नम्मा : भारताची शूर स्वातंत्र्यसेनानी (Rani Kittur Chennamma Was The Powerful Freedom Fighter In Yesteryears)

कित्तूरची राणी, कित्तूर चेन्नम्मा 1824 मध्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व लष्कराच्या नियमांच्या अंमलबजावणीच्या विरुद्ध सशस्त्र बंडाचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय राज्यकर्ती होती. राणी लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीच्या 56वर्षे आधी तिचा जन्म झाला. त्यामुळे भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणारी ती पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी बनली.
सुंदर अन् अतिशय हुशार कन्या
चेन्नम्मा याचा अर्थ ‘सुंदरकन्या’ या सुंदरकन्येचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील काकाटी या छोट्याशा गावात झाला. धुळप्पा व पद्मावती या लिंगायत समाजाच्या राजघराण्याच्या दांपत्याची ही कन्या सर्वार्थाने सुंदर व अतिशय हुशार होती. तिला संस्कृत, कन्नड, मराठी व उर्दू भाषा अवगत होत्या. तिने लहान वयातच घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजीचे व युद्ध कौशल्याचे प्रशिक्षण घेतले होते. तिच्या शौर्यासाठी ती तिच्या गावात परिचित होती.
वयाच्या 15व्या वर्षी तिचे कित्तूरचा राजा मल्लराजा देसाई याच्याशी लग्न झाले आणि ती कित्तूरची राणी बनली. तिला एक मुलगा झाला होता.1816मध्ये तिच्या पतीचे आणि 1824 मध्ये मुलाचे निधन झाले. कित्तूर चेन्नम्मा हिने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर कित्तूरच्या गादीचा वारसदार म्हणून शिवलिंगप्पा या मुलाला दत्तक घेतले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नम्माचे हे कृत्य गंभीरपणे घेतले आणि शिवलिंगप्पाला राज्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. ब्रिटिशांच्या नियमानुसार दत्तक घेतलेल्या मुलाला गादीचे उत्तराधिकारीपद मिळत नाही. राज्यकर्त्याला स्वतःचे मूल नसेल तर ते राज्य ब्रिटिश शासनाकडे जाते. हा नियम लॉर्ड डलहौसी यानी 1848 ते 1856 या काळासाठी लागू केला होता.

ब्रिटिश अधिकार्‍यांना पळवून लावले
कित्तूर चेन्नम्माने शिवलिंगप्पाला गादीपासून दूर करण्याच्या ब्रिटिश आदेशाचा भंग केला. तिने मुंबईच्या लॉर्ड एल्फिन्स्टन या ब्रिटिश राज्यपालांना कित्तूरच्या राजकारणासाठी आपली बाजू मांडता यावी यासाठी पत्र पाठविले, पण चेन्नम्माची ही विनंती फेटाळून लावली गेली.त्यामुळे कित्तूर राज्य धारवाडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आधिपत्याखाली गेले. कित्तूर या राज्याचे जिल्हाधिकारी होते सेंट जॉन ठाकरे आणि आयुक्त होते सर चॅपलिन. या दोघांनीही चेन्नम्माला आणि शिवलिंगप्पाला राज्यकर्ते म्हणून महत्त्व दिलं नाही आणि राणी चेन्नम्माला आपले राज्य परत देण्यास सांगितले. परंतु राणी चेन्नम्मानी इंग्रजांच्या या आदेशाचाही भंग केला. यामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धाला तोंड फुटले.
ब्रिटिशांनी सुमारे 15 लाख रुपये किंमतीचा कित्तूरचा खजिना व दागदागिने लुटण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यात अयशस्वी ठरले. ब्रिटिशांनी कित्तूरवर 20,000 सैनिक आणि 400 बंदुकीच्या जोरावर हल्ला केला. हे सैन्य प्रामुख्याने मद्रासच्या घोडदळ व तोफखान्याचे होते.
ब्रिटिश आणि कित्तूर यांच्यात ऑक्टोबर 1824 मध्ये झालेल्या पहिल्या लढाईत ब्रिटिश सैन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ब्रिटिश कलेक्टर आणि पोलिटिकल एजंट सेंट जॉन ठाकरे यांनाही कित्तूर सैन्याने या लढाईत ठार मारले. कलेक्टरचे निधन व ब्रिटिशांच्या सैन्याचे झालेले नुकसान याला राणीचे सेनापती अमातूर बाळाप्पा हे कारणीभूत ठरले. सर वॉल्टर इलियट आणि मिस्टर स्टीव्हनसन या दोन ब्रिटिश अधिकार्‍यांनाही राणी चेन्नम्मा यांच्या सैन्याने पळवून नेले होते.
पुढील विनाश आणि युद्ध टाळण्यासाठी राणी चेन्नम्मा यांनी ब्रिटिश आयुक्त सर चॅपलिन आणि बॉम्बेच्या राज्यपाल यांच्याशी वाटाघाटी केल्या. ब्रिटिशांच्या कैद्यांना सोडले, युद्ध तहकूब केले. तथापि, राणी चेन्नम्माची ही एक चाल होती हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. इतक्या छोट्या भारतीय राज्यकर्त्याच्या पहिल्या पराभवाने अपमानित झालेल्या सर चॅपलिनने विश्वासघात करून म्हैसूर आणि सोलापूरहून बर्‍याच मोठ्या सैन्यासह परत कित्तूरवर हल्ला केला.

बेळहोंगल किल्ल्यात आजीवन कैद
दुसरे युद्धही राणी चेन्नम्मा तिचे सेनापती सांगोली रामण्णा आणि गुरूसिद्धप्पा यांच्या मदतीने लढली. त्यात सर थॉमस मन्रोचा पुतण्या जो सोलापूरचा उपजिल्हाधिकारी होता तो मारला गेला. चेन्नम्मा व तिच्या सैनिकांनी बारा दिवस शर्थीने लढून त्यांचा किल्ला वाचवायचा प्रयत्न केला. पण मल्लप्पा शेट्टी व वेंकट राव या चेन्नमाच्या दोन सैनिकांनी तोफांच्या दारूगोळ्यात माती व गाईचे शेण मिसळून तिचा विश्वासघात केला. शेवटी, ब्रिटिशांच्या मोठ्या सैन्यबळापुढे राणी चेन्नम्माचे सैन्य तोकडे पडले. त्यामुळे या युद्धामध्ये राणी चेन्नम्माचा पराभव झाला आणि इंग्रजांनी तिला पकडले व बेळहोंगल किल्ल्यात आजीवन कैद केले.
राणी चेन्नम्मा हिचे निष्ठावंत सेनापती सांगोली रामण्णा यांनी 1829 पर्यंत तिच्या अनुपस्थितीतही गनिमी काव्याने युद्ध चालू ठेवले, परंतु ते व्यर्थ ठरले. कित्तूरचा शासक म्हणून राणी चेन्नम्माचा दत्तक मुलगा शिवलिंगप्पा याला गादीवर बसवण्याची त्यांची इच्छा होती, परंतु ब्रिटिशांनी त्याला पकडले आणि फासावर चढवले. शिवलिंगप्पालाही ब्रिटिश सैन्याने अटक केली.
कीर्तिमान स्वातंत्र्यसेनानी
कैद झाल्यानंतर राणी चेन्नम्माला आपल्या आयुष्याची शेवटची पाच वर्षे बेळहोंगल किल्ल्यातील तुरुंगात घालवावी लागली. तो काळ तिने पवित्र ग्रंथांचे वाचन आणि पूजा-अर्चा करण्यात घालवला. 21 फेब्रुवारी 1829 रोजी तिने बेळहोंगल किल्ल्यावर शेवटचा श्वास घेतला.
राणी चेन्नम्माची समाधी बेळहोंगल तालुक्यात शासकीय यंत्रणांच्या देखरेखीखाली आहे. तथापि, या शूर राणीचे दफन केलेले स्थान दुर्लक्षितच राहिले.
कित्तूर राणी चेन्नम्मा ही जरी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध जिंकू शकली नाही, तरीही ती भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणा ठरली. भारतीय राज्यकर्ते ब्रिटिशांचे कायदे सहज स्वीकारणार नाहीत आणि त्यासाठी ते लढतीलही असा विश्वास तिने निर्माण केला. चेन्नम्माच्या ब्रिटिशांविरुद्धच्या बंडखोरीचा अंत तिच्या कैदेतून झाला, तथापि, ती एक कीर्तिमान स्वातंत्र्यसेनानी आणि भारतातील स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनली. राणी चेन्नम्मा ही तिच्या पराक्रमासाठी सदैव स्मरणात राहील. ब्रिटिश सैन्याविरुद्धचा तिचा धाडसी विरोध यावर ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक प्रेरणादायक नाटके, लोकगीते आणि कथांचा विषय झाला.

कित्तूर उत्सव
ब्रिटिश सैन्याविरुद्धचा राणी चेन्नम्माचा पहिला विजय अजूनही कित्तूरमध्ये ‘कित्तूर उत्सव’ या नावाने दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो. भारतीय टपाल खात्याने 1977 साली राणीचे चित्र असलेले एक टपाल तिकीटही छापले होते.
11 सप्टेंबर 2007 रोजी राणी चेन्नम्माच्या पुतळ्याचे अनावरण नवी दिल्लीतील भारतीय संसद संकुलात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले. हा पुतळा विजय गौर यांनी तयार केला असून तो कित्तूर राणी चेन्नम्मा मेमोरियल कमिटीने भारतीय संसदेला दिला. बेंगळुरू आणि कित्तूर येथेही राणी चेन्नम्माच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. कित्तूर चेन्नम्मा नावाचा ऐतिहासिक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन बी.आर.पंथुलू यांनी केले होते. तसेच बंगळुरू आणि कोल्हापूरला जोडणार्‍या एका लोकप्रिय भारतीय रेल्वेला राणी चेन्नम्मा एक्सप्रेस हे नाव देण्यात आले आहे. 
– अनघा शिराळकर